५ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याने खळबळ
कोपरगाव प्रतिनिधी दि. २३ : माणुसकीला काळीमा फासणारी घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे तीन दिवसांपुर्वी घडली. तीन दिवसापासुन अज्ञात बालकाचा खुन कोणी केला? का केला, खुन झालेल्या बालकांचे नाव व आई वडील कोण आहेत. तो कोणत्या गावात राहत होता याची माहिती घेण्याबरोबर खुन करणारा मुख्य मारेकरी कोण आहे? याची सखोल माहीती घेवून खुनाच्या कटातील आरोपींना गजाआड करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी सह अनेक कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन पथके तपास करीत आहेत.
माञ पोलीसांना आजूनही अपेक्षित धागेदोरे हाती लागले नसल्याची माहीती आहे. खुन झालेल्या अज्ञात बालकाचा एक फोटो मिळाल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळाली आहे तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या जोरावर कोपरगाव तालुका पोलीस खुन करणाऱ्या मुख्य सुञधारापर्यंत पोहचणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अंदाजे ५ ते ६ वर्षीय असलेल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून चासनळी येथील गोदावरी नदीत पुलाखाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हत्या कशासाठी केली ? असून हा नरबळी तर नाही ना? अशा एक ना अनेक तर्क वितर्कामुळे या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-सुरत राज्य मार्गावरील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील पुलाच्या खाली दुपारच्या सुमारासं नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले. असता जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे समजले. घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे, मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
घटनेचे गांभीर्याने लक्षात घेतवून पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले असले तरीही अपेक्षित यश आले नाही. वेळेत तपास लागत नसल्याने या खुना संदर्भात नागरीकांमध्ये विविध शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे. तसेच संताप व्यक्त केला जात असून या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केले आहे. पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी, तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीसांच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.