संजीवनी इंटरनॅशनल स्कूल व अकॅडमीने जिंकली ८० हजारांची बक्षिसे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : पवई, मुंबई येथिल आयआयटी, बॉम्बे आयोजीत व ब्लिक्स कंपनी प्रायोजीत राष्ट्रीय टेकफेस्ट ब्लिक्सथॉन या रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी  व संजीवनी अकॅडमी, कोपरगांव येथिल बाल तंत्रज्ञांनी संजीवनीतुन मिळालेल्या तांत्रिक शिक्षणाच्या जोरावर आपले बुध्दिचातुर्य दाखवत सुमारे १००० पेक्षा अधिक स्पर्धकांतुन व आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्पर्धेत रू ८० हजारांचे रोख बक्षिसे, प्रशस्तीपत्रके व स्मृतिचिन्ह मिळवित संजीवनीतुन मिळालेली प्रतिभा संपन्नता सिध्द केली अशी माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 पत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील वर्षीही रू ७५ हजारांची बक्षिसे मिळविली होती. याही वर्षी  संजीवनीने घवघवीत यश  प्राप्त केले आहे. स्पेशल वर्गवारीमध्ये दोन टीमने बक्षिस मिळविले. यात पहिल्या टीममध्ये राजविका अमित कोल्हे, जय तरूण भुसारी, साई गणेश  सिंगर व नील विकास काटे यांचा समावेश  होता. दुसऱ्या  टीममध्ये अथर्व पंकज बुब व रोहित प्रेम दादवाणी यांचा समावेश  होता. या स्पर्धा सिनिअर व ज्युनिअर गटात घेतल्या जातात. सिनिअर गटात इ.९ वी ते इंजिनिअरींग कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी व ज्युनिअर गटात इ.५ वी ते इ.८ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभाग नोंदवितात.

सिनिअर गटात ४४८ स्पर्धकांतुन पहिला, दुसरा व तिसराही क्रमांक पटकावुन विजयाची हॅट्रीक केली. या गटात पार्थ अनिल पवार, देवांग तुषार  जमधडे व तन्मय अनिल शिंदे  यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळवला. अथर्व पंकज बुब व रोहित प्रेम दादवाणी यांनी दुसरा क्रमांक मिळविला. हर्षवर्धन  प्रसाद खालकर, अभय दिपक गाडे व साची विरेश अग्रवाल यांनी तिसरा क्रमांक मिळविला. ज्युनिअर गटात ६०३ स्पर्धकांमधुन ईशान  इम्राण सय्यद व सर्वेश  तुषार शेळके यांनी दुसरा क्रमांक मिळविला तर आर्यन चेतन बावनकर व राहुल सारंग बावनकर यांनी तिसरा क्रमांक मिळविला.

या स्पर्धांमध्ये देशभरातील शालेय विद्यार्थ्यांबरोबरच पॉलीटेक्निक्स, इंजिनिअरींग कॉलेजेस मधिल विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परंतु संजीवनीमध्ये शालेय  स्तरावरच अभियांत्रिकेचेही ज्ञान मिळत असल्याने संजीवनीच्याच विद्यार्थ्यांनी विजयश्री खेचुन आणली.            विद्यार्थ्यांच्या या राष्ट्रीय  यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी तसेच प्राचार्या सुधा सुब्रमण्यम व शैला  झुंजारराव, मार्गदर्शक प्रा.आदित्य गायकवाड यांचे अभिनंदन केले.