सहलीमधील विद्यार्थ्यांच्या व्याहरमुल्यांचा गौरव

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते सातवीच्या १५६ विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच परतली. शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे यांच्या प्रेरणेने, सहल प्रमुख रविंद्र पवार  यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य शिवदास सरोदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रवासात मुलांनी मनमुराद आनंद लुटला.

आठ शिक्षक, दोन  शिक्षिका व दोन कर्मचारी यांच्या उत्तम सहकार्यामुळे तीन एसटी बसेस मधून संपूर्ण सहल यशस्वीरीत्या पार पडली. रांजणगाव, आळंदी, देहू, एकवीरा देवी, लोणावळा वॅक्स म्युझियम, महड, पाली, मुरुड जंजिरा किल्ला, काशीद बीच, बिर्ला मंदिर इत्यादी स्थळांना भेटी देण्यात आल्या.

यावेळी सहल समितीच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्वांच्या वर्तणुकीचे निरीक्षण करुन सर्वोत्कृष्ट सहभाग असणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात इयत्ता सहावीच्या  तेजस्विनी दीपक कुलकर्णी हीचा अभ्यासाच्या दृष्टीने सहल करणारी तसेच सहकार्य भावना व संघटन कौशल्य असणारी विद्यार्थीनी म्हणून,

तर इयत्ता पाचवीतील भार्गव सतीश देशपांडे याची आणलेले पैसे व शिल्लक रक्कम यानुसार अर्थशुचिता पाळणारा व उत्कृष्ट व्यवहारज्ञान असलेला हिशोबी विद्यार्थी म्हणून तर संपूर्ण सहली दरम्यान स्वयंशिस्त पालन करणारा  आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून इयत्ता ७ वीतील महेश प्रवीण भंडारी यांचा विद्यालयाने सन्मान चिन्ह देऊन गौरविले आहे. प्रवासासाठी उत्तम सहकार्य केल्याबद्दल आगार प्रमुख व गाडी चालकांचा सन्मान करण्यात आला.