कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतक-यांना जास्तीच्या सुविधा मिळाव्या म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना लागु केली.

त्याअंतर्गत कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्ताव दिला त्याचा मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला त्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सदर शेतकरी भवनांस १ कोटी ७३ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहिती माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघात शेतक-यांची संख्या विस्तृत असुन येथील तालुका बाजार समितीस स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणांत सुविधा उपलब्ध करून दिल्याने आजुबाजुच्या तालुक्यातील शेतक-यांनाही त्याचा लाभ होत आहे.

मात्र दुरवरून येणा-या शेतक-यांना त्यांचा शेतमाल विक्री करतांना मुक्कामासह अन्य पायाभूत सुविधांची अडचण होत होती त्यासाठी शासनाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन अंतर्गत सभापती साहेबराव रोहोम व सर्व संचालकांनी प्रस्ताव देवुन त्यासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली होती. याकामी आपण पाठपुरावा केल्याचे त्या म्हणाल्या. शासनाने यासाठी १ कोटी ७३ लाख ८० हजार रूपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाचे आभार मानले आहे.
