गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : गेल्या अडीच-तीन वर्षापासून पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंचायत समिती सभापतीपदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली. त्यात कोपरगावचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले गेले आहे. आता या राखीव जागेवर कोणाला संधी मिळते हे येता काळच ठरवील.आरक्षण प्रतीक्षेत असलेल्या इतर प्रवर्गात मात्र भयाण शांतता पसरली आहे.

काही दिवसांपासून सभापतीपदासाठी चर्चा आणि राजकीय हालचाली जोरात सुरु होत्या. कोण कोणत्या गणातून लढणार, कोणता उमेदवार विरोधी राहणार याबाबत चर्चा सुरु होत्या. पंचायत समिती सभापतीपदावर कोणता प्रवर्ग आरक्षित होतो याबाबत चर्चा झडत होत्या. विविध गट आणि गाव नेत्यांची तयारीही सुरु झाली होती. गणिते, आखाडे, दावे-प्रतिदावे मांडले जात होते. मात्र आरक्षण जाहीर होताच अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या प्रभावी संभाव्य उमेदवारांच्या चेहऱ्यावरचा उत्साह एकदम कमी झाला आहे.

या पडलेल्या आरक्षणाच्या निर्णयानंतर आता तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण सध्याच्या आरक्षणानुसार मर्यादित उमेदवारांनाच सभापती पदाची संधी मिळणार आहे. तालुक्यातील राजकीय पटलावर अधिराज्य करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे आपल्या गटाकडून कोणता चेहरा सभापतीपदासाठी पुढे आणून संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष उबाठा शिवसेना, शिंदे सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट या पदासाठी कशी रणनीती आखतात, कि युती, महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जातात याबाबत अजून खलबते बाकी आहेत. वरिष्ठांच्या सूचना जशा येतील तसे चित्र बदलणार आहे. ऐनवेळी कोणाचा पत्ता कट करून कोणाला संधी दिली जाते या डावपेचाकडे देखील लक्ष लागून आहे. पुढील काळात कोणत्या गटाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार व कोणती नवी राजकीय समीकरणे घडणार याकडे मतदार राजाचे लक्ष लागून आहे.
