कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील झगडेफाटा-पोहेगांव रांजणगांव देशमुख राज्यमार्ग क्रमांक ६५ ची मोठ्या प्रमाणांत दुरावस्था झाली त्यात अनेक निरपराध प्रवाशांचे बळी गेले तेंव्हा त्याची दुरूस्ती तात्काळ व्हावी यासाठी आम्ही पोहेगांवकर व्हाईस ऑफ युथ अंतर्गत पाठपुरावा केला ही सत्य परिस्थिती असतांना येथील लोकप्रतिनिधींनी त्यासंदर्भात कुठलाही पाठपुरावा न करताच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यासोबत पाहणी करून श्रेय लाटले आहे. ते चुकीचे असल्याचे पत्रक व्हाईस ऑफ युथचे सुशिलकुमार सुभाष औताडे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. सदरच्या रस्त्याचे काम सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी दिले असेही ते म्हणाले.

त्यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, झगडेफाटा-पोहेगांव रांजणगांव देशमुख राज्यमार्ग क्रमांक ६५ हा प्रमुख वाहतुकीचा रस्ता आहे मात्र त्यास मोठ्या प्रमाणांत खड्डे पडुन त्याची दुरावस्था झाली त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी, तहसिलदार महेश सावंत, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना १९ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन दिले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भेट देवून पाहणी केली व या प्रमुख रस्त्याचे काम सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्या तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविणे काम होणार असून या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागून सततचे होणारे अपघात, जीवीतहानी तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान होणारा त्रास हा कायमस्वरूपी मिटेल त्यामुळे या लढयात ज्या ज्ञात अज्ञातांनी सहकार्य केले त्याचे सुशिलकुमार औताडे यांनी आभार मानले आहे.



 
						 
						