कोपरगाव प्रतिनिधी दि. ३१ : शहरातील येवला नाक्यावर झालेल्या अपघातात २९ वर्षीय आदित्य देवकर या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असुन ही दुर्घटना कोपरगावच्या लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे झाली असुन कोपरगावातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवरही संताप व्यक्त करत राज्यकर्ते म्हणून सर्वांनी गांभीर्याने काम करण्याची गरज आहे असे युवानेते विवेक कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगावातील खड्डेमय रस्त्यावर अनेक निष्पाप नागरिकांचे जीव गेले आहेत, पण लोकप्रतिनिधी मात्र निर्धास्त आहेत. अनेकदा चार हजार कोटींच्या विकासाच्या वल्गना करण्यात आल्या.प्रत्यक्षात नागरिक अजूनही रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत.कोपरगाव मतदारसंघात या अवस्थेवर शासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे,अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाला आवाहन करताना म्हणाले, राहाता व कोपरगाव परिसरात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ऊसतोड कामगार व नागरिक भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. ऊसतोड हंगाम सुरू होण्यापूर्वी वनविभागाने योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा कामगारांच्या जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

तसेच त्यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी संजीनवी युवा प्रतिष्ठानने केलेल्या मागणीवरून सोनेवाडी एमआयडीसी मंजूर झाली. तिथे नवीन उद्योग उभे राहून त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही विवेक कोल्हे म्हणाले.

आगामी काळात नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती काही ग्रामपंचायत अशा विविध निवडणुका आहेत. आता कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यात पूर्ण शक्तीनिशी कार्यकर्त्यांना ताकद देऊन गुलाल घेण्यासाठी सज्ज होण्याचे भाष्य त्यांनी केले आहे.



 
						 
						