करवाढीचा प्रश्न आमदार काळे मार्गी लावतील – संदीप वर्पे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव शहराचा जटील झालेला पाणी प्रश्न शहरातील जनतेच्या मदतीने आ. आशुतोष काळे यांनी सोडवून दाखविला आहे. प्रश्नांची सोडवणूक करण्यात ते माहीर असून पाणी प्रश्नाप्रमाणे वाढीव करवाढीचा प्रश्न देखील आ. आशुतोष काळे नक्की सोडवतील असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात संदीप वर्पे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव नगरपरिषदेने खाजगी कंपनीकडून केलेल्या सर्व्हेच्या आधारावर केलेली अवास्तव करवाढ कोपरगाव शहरवासीयांना आर्थिक संकटात टाकणारी आहे. त्याबाबत शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण असून चुकीच्या सर्व्हेमुळे अनेक नागरिकांच्या मालमत्तांना दुप्पट, तिप्पट कर लावण्यात आला आहे.

हि करवाढ बहुतांश नागरिकांना मान्य नसून या अवास्तव करवाढी विरोधात असंख्य नागरिकांच्या हरकती आहेत. त्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारावर मदत केंद्र देखील सुरु केले असून या मदत केंद्रावर नागरिकांनी आपल्या हरकती नोंदविणे आवश्यक आहे.

आ. आशुतोष काळे यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांनी मागील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न कोपरगावच्या जनतेला सोबत घेवून सोडविला असून शहरवासियांना नियमित व स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे हे कोपरगावकर पाहत आहेत.

कोपरगाव शहराच्या विकासासाठी रस्ते,स्मशानभूमी, कब्रस्तान, कोपरगाव नगरपरिषद इमारत अशा विविध कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी आ. आशुतोष काळे यांनी मिळवून दिल्यामुळे नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी वाढीव करवाढी बाबत देखील घाबरून जावू नये. आ. आशुतोष काळे निश्चितपणे हा प्रश्न देखील मार्गी लावतील.

ज्या नागरिकांना आपल्या मालमत्तेच्या वाढीव कराबाबत हरकती असतील अशा नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात जेणेकरून ज्या नागरिकांच्या हरकती येतील त्या सर्व नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास संदीप वर्पे यांनी व्यक्त केला आहे.