कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : शहरात थंडीची लाट सुरु झाली, माञ नगरपालिका निवडणुकीची धग अपेक्षित प्रमाणात दिसत नसल्याने पालीका निवडणुकीचे वातावरण आजूनही गारठलेले दिसत आहे. काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज न भरताच भावी नगराध्यक्ष, फिक्स नगराध्यक्ष, भावी नगरसेवक फिक्स नगरसेवक अशा आशयाचे बॅनर बनवून सोशल मिडियावर झळकत आहेत, कोणी दबाव तंञाचा वापर करुन उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत तर कोणी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत आहेत. काहीही झालं तरी जो पर्यंत आमदार आशुतोष काळे यांच्याकडून उमेदवारांची नावे जाहीर होत नाही तोपर्यंत पालीका निवडणुकीचे वातावरण तापणार नाही.

सध्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्यावतीने भाजप,आरपीआय व मिञ पक्षाच्यावतीने लोकसेवा आघाडीचे २१ उमेदवारांचे नावे प्रभाग निहाय जाहीर केले तसेच नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांच्या नावाची घोषणा करून पालीकेच्या आखाड्यात उतरले आहेत. तर दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांच्याकडील उमेदवारांची सांगीवागी अशी चर्चा आहे. काही उमेदवारांनी आपला प्रचारही सुरु केला आहे. माञ आमदार काळे यांच्याकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह प्रभाग निहाय उमेदवारांचे नावे जाहीर न झाल्यामुळे कोपरगाव नगरपालीकेच्या निवडणुकीत सध्यातरी कोल्हे मैदानात तर काळे गुलदस्त्यात असे चिञ आहे.

काही इच्छुक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून मतदारांच्या गाठीभेटी घेवून जरी प्रचारात आघाडी घेतली असली तरीही त्यांची उमेदवारी संबधीत पक्ष पार्टीकडून अधिकृत जाहीर न केल्याने काहींची कोंडी झाली तर काहींना आपल्या नेत्यांचा मान राखण्यासाठी माघार घेण्याची तयारी केली आहे. आमदार काळे यांच्या गटाकडून कोणाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार, काळेंची कोणाबरोबर युती होणार, काळे या निवडणुकीत कोणता फाॅर्म्युला वापरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी देतात याकडे कोल्हे गटासह इतर अपक्ष उमेदवारांचे लक्ष लागले आहे. अशातच आमदार काळे यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात यावर निवडणुकीचे खरे चिञ स्पष्ट होईल.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार , काॅंग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या भूमिका अजूनतरी स्पष्ट नसल्याने या पक्षाचे कार्यकर्ते काळे-कोल्हे गटात मनोमिलन करतात कि, स्वतंत्र ताकत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात याचेही चित्र अस्पष्ट आहे. शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, ठाकरे शिवसेनेचे राजेंद्र झावरे, भरत मोरे यांच्या भूमिकेवर पालीका निवडणुकीची रंगत अधिक उजळणार आहे.
गेल्या निवडणुकीत काळे कोल्हे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला डावलून नागरीकांनी पदर खर्चाने अपक्ष नगराध्यक्ष निवडला होता त्याच धर्तीवर पुन्हा आपली लाॅटरी लागेल या आशेने काहींनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत का? मागच्या निवडणुकीत अपक्ष नगराध्यक्ष झाल्यामुळे अनेकांना पुन्हा अशी संधी मतदार देतील या आशेने काहींनी निवडणुकीची तयारी केल्याची चर्चा सुरु आहे. यावेळी कोण कोणाच्या विरोधात उभं राहील नेते कोणाच्या पाठीमागे भक्कम उभे राहतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत कोपरगाव नगरपालीकेची सत्ता एकहाती कोण काबिज करतोय याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. काहीही झाले तरी यावेळी काळे-कोल्हे यांनी पालीकेच्या निवडणुकीची तयारी विचारपूर्वक व काळजीने लढवण्याची तयारी केल्याचे सध्यातरी दिसत आहे. उमेदवारी न मिळालेले नाराज मंडळी कोणाच्या बाजूने काम करतात यावरही बरेच काही अवलंबून आहे. या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांची रणनिती लक्षवेधी असणार आहे.


