कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव तालुक्यात दोन निरपराध व्यक्तींचा बळी घेवून नागरिकांवर हल्ला करत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. घडलेल्या घटनांचे गांभीर्य ओळखून व आ.आशुतोष काळेंच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वन विभागाला नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्या सूचनेनुसार वन विभागाने केलेले प्रयत्न दहा दिवसानंतर यशस्वी झाले आहे. शनिवार (दि.१५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सोनारी-टाकळी रोडवर येसगाव-टाकळी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला टिपण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे टाकळी-सोनारी-खिर्डी गणेश आदी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.

काही दिवसांपूर्वी टाकळी येथे नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीनवर्षीय चिमुरडीचा बुधवार (दि.५) रोजी बिबट्याने बळी घेतला होता. त्या घटनेला आठवडाही उलटला नाही, तोच सोमवार (दि.१०) रोजी शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या येसगाव येथील शांताबाई निकोले (वय ६०) या महिलेला बिबट्याने ठार केले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी वन विभागा विरुद्ध रोष व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले होते.

त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आक्रमक पवित्रा घेत त्याच ठिकाणाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती देवून माणसांच्या रक्ताची चटक लागलेल्या नरभक्षक बिबट्याला तातडीने ठार मारण्याच्या सूचना वनविभागाला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी आणि वनविभागाशी चर्चा करून तातडीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठी विशेष पथक नेमण्यात येवून टाकळी परिसरात पिंजरे लावण्यात येवून गस्त, ट्रॅकिंग, ड्रोन कॅमेरा यांची मदत घेऊन नरभक्षक बिबट्याचा शोध सुरू होता. कोपरगाव राहुरी आणि संगमनेर वन विभागाचे पथक बिबट्याचा शोध घेत होते. अखेर या बिबट्याला शनिवार (दि.१५) रोजी रात्री उशिरा या पथकाला बिबट्याचा माग काढण्यात यश आले आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला ठार करण्यात आले. या कारवाईबद्दल आ.आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मा.जिल्हाधिकारी व वनविभागाचे आभार मानले आहेत.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याकरीता जिल्हा नियोजन अंतर्गत ८ कोटी १३ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. यामध्ये बिबट्यांना सुरक्षित पकडण्यासाठी ३०० पिंजरे, वनक्षेत्रातील बिबट्यांच्या हालचालींचे निरीक्षणासाठी ३०० ट्रॅप कॅमेरे, जॅकेट्स, शूज, टॉर्च गन्स यासारखे रेस्क्यू उपकरणे, प्रोटेक्टिव्ह शिल्ड्स रेस्क्यू टीमसाठी सुरक्षात्मक साधने व २२ नवीन रेस्क्यू वाहने तातडीने खरेदी करण्यात येणार आहेत. याद्वारे विविध आवश्यक साहित्य खरेदी करून बिबट्यांना पकडले जाणार आहे. या पकडलेल्या बिबट्यांना गुजरातमधील वनतारा अभयारण्यात सुरक्षित सोडण्यात येणार आहे.- आ.आशुतोष काळे


