युवानेते विवेक कोल्हे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची विविध प्रश्नांबाबत भेट

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे विवेक कोल्हे यांनी सदिच्छा भेट घेत कोपरगाव शहर व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान धोत्रे, नाथगंगा, बापतरे, पुरणगाव आदी परिसरातील सुमारे ५००० एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेला आणि २०१९ पासून प्रलंबित असलेला स्मार्ट सिटी प्रकल्पासह संबंधित शेतकरी बांधवांच्या चार प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास तातडीने करारनामे प्रक्रिया सुरू होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी नमूद केले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

यासह कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा योजना, जलसिंचन प्रकल्प, रस्ते विकास, नागरी सुविधा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांवरही मुद्देसूद मांडणी करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या वाढत्या गरजा आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावच्या विकासात्मक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत आवश्यक ते मार्गदर्शन केले व विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. शासन व स्थानिक पातळीवरील समन्वय अधिक बळकट करून कोपरगावच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचा निर्धार या भेटीतून अधोरेखित झाला.

ही भेट कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार असून जनतेच्या अपेक्षा व विश्वासाला न्याय देण्यासाठी विकासकामांना गती देण्याचा कटाक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply