सरकारच गरीबांना आळ्या आणि जाळ्या खायला देते, मुंढे साहेब याकडे लक्ष द्या

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 30 : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांची झोप उडवली. अनेक ठिकाणी छापेमारी करुन सर्वसामान्य नागरीकांना भेसळ व निर्जंतुक अन्नधान्य, खाद्यपदार्थ मिळावे म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची संपूर्ण राज्याने दखल घेतली सर्वांनी भरभरून मुंढे यांचे कौतुक केले जात आहेत.

अनेक खाजगी कारखाने अन्नपदार्थ बनवताना भेसळयुक्त बनवण्यासाठी धडपड आहेत. माञ खुद्द सरकारच नागरीकांना निकृष्ट दर्जाचे तांदुळ खाण्यासाठी राज्यभर वाटप करीत आहे. गेल्या अनेक महीण्यापासुन शासनमान्य स्वस्त धान्य दुकान सरकारतर्फे जाळ्या आणि आळ्या असलेले तांदूळ गोरगरीब जनतेच्या ताटात वाढून त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

विशेष म्हणजे दर्जेदार धान्य खरेदी करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध स्तरावर अनेक अधिकारी गलेलठ्ठ पगार घेवून  शासनाच्या धान्याची खरेदी करीत असतात, धान्य चांगल्या दर्जाचे आहे की नाही त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी उच्च शिक्षित अधिकारी कार्यरत असुनही शासनाच्यावतीने निकृष्ट दर्जाचे तांदुळ नागरीकांच्या ताटात का दिले जाते असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरीकामधून उपस्थित  केला जात आहे.

तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली जर अन्न औषध प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असेल तर सर्वसामान्य नागरीकांनी शासनाने दिलेल्या आळ्या आणि जाळ्यांचे तांदुळ डोळे झाकून खायचे का? एकाबाजुला दुष्काळाच्या तिव्र झळा सोसाव्या लागत असताना महागाईचा राक्षस गरीबांच्या जगण्याची हालबेहाल  करीत आहे.

निसर्ग  कोपला, शेती उजाड झाली, उत्पादन होत नाही, उत्पन्नाचे मार्ग बंद होत आहेत. शासनाच्या मदतीवर गोरगरीब जगण्याच्या आशा धरून आहेत. मोफत अन्नधान्य मिळावे म्हणून राशन दुकानावर गरीबांनी रांगा लावल्या. शासनाने मोफत धान्य देण्याच्या नावाखाली पदरी आळ्या आणि जाळ्या असलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ देवून ऐन दिवाळीच्या तोंडावर गरीबांची थट्टा करीत असल्याचे चिञ दिसत आहे. 

 शासनाने निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणाऱ्यावर लगाम बसवून नागरीकांना उत्तम दर्जाचे धान्य किमान सणासुदीच्या काळात तरी देणे गरजेचे आहे. संपूर्ण राज्यात भंडारा, गोंदिया येथील शासनाच्या प्रमुख गोदामातील निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा बंद करुन चांगल्या प्रतिचा तांदूळ व इतर धान्य पुरवठा करावा अशी मागणी आता  अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांपासुन ते थेट दुकानदार व नागरीक करीत आहेत. निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करणाऱ्या गोदामावर छापेमारी करुन निकृष्ट तांदूळ जप्ती करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

Leave a Reply