अखेर शेवगावातही शिंदे गट शिवसेना कार्यरत, डहाळे यांची तालुकाप्रमुख पदी नियुक्ती

शेवगाव प्रतिनिधी दि. १७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बहुसंख्य आमदार खासदारांना घेऊन स्वतंत्र गट  स्थापन केला. त्या बळावर ते राज्याचे मुख्यमंत्री ही झाले आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही शिंदे गटाची शिवसेना असल्याचा दावा करून राज्यात गावोगावी समांतर शिवसेना स्थापनेची मोहिम सुरु केली.

या घटनेला आता दोन महिने होत आले तरी शेवगाव येथील शिवसेना अभेद्य होती. मात्र काल तिला छेद गेला. अखेर शेवगावातही शिंदे गटाच्या शिवसेना तालुकाध्यक्षपदी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते अशुतोष डहाळे यांची निवड झाल्याचे घोषित झाले. डहाळे यांची निवड होताच त्यांच्या समर्थक विविध संघटना व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
        

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना प्रदेश सचिव संजय मोरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना दिले. तालुक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेनेच्या स्थापनेपासून कार्यरत आहे .यात अनेक पदाधिकारी व शिवसैनिक निष्ठेने काम करत आहेत.     
        राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गट शिवसेना कार्यरत होत असतांना शेवगाव तालुक्यात देखील शिंदे गटाची शिवसेना होते की नाही याबद्दल कालपर्यंत संभ्रमावस्था होती.  जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन डहाळे यांचे नावाची तालुकाप्रमुख पदासाठी शिफारस केली. डहाळे हे चळवळीतील कार्यकर्ते असून ते अनेक सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवत असतात. याची दखल घेऊन प्रदेश सचिव मोरे यांनी डहाळे यांच्या नावाची तालुका प्रमुख पदी निवड केली आहे.

येत्या पंधरा दिवसात शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येतील. या निवडी करताना जनमत असणाऱ्यांचा समावेश केला जाईल. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्राधान्य  राहील. तसेच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी तालुका शिवसेना भक्कम केली जाईल.
                      आशुतोष दत्तात्रय डहाळे,
                  शिवसेना शेवगाव तालुकाप्रमुख