उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांची मागणी निराधार –  ॲड शिंदे

 महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट जागेचा वाद सुरु

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांचे उपोषण हे निराधार असुन या जागांचा वाद हा न्याय प्रविष्ट असुन त्यावर न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नसुन याचिकाकर्ते व उपोषण करणारे बाळासाहेब जाधव यांनी उलट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे.

उलट त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मत महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. विद्यासागर शिंदे यांनी साईबाबा तपोभूमी येथील सभागृहात पञकार परिषद घेवून आमदार आशुतोष काळे व त्यांच्या ट्रस्टच्या वतीने कायदेशीर बाजू मांडली. यावेळी बोलताना ॲड. विद्यासागर शिंदे पुढे म्हणाले की, प्रसिद्धी माध्यमांनी न्यायप्रविष्ट बाजू असल्याने ती समजुन उमजून प्रसिद्ध करावी. कोणाचं तरी ऐकून एखाद्या संस्थेची बदनामी करू नये. 

 कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने ५० एक्कर ३३ गुंठे जागा आहे. ती जागा शासकीय मालकीची जरी असली तरी न्यायालयीन बाब आहे. शासनाने ज्या हेतूसाठी सन १९५२ साली जागा दिली त्या हेतू पासुन संबंधित संस्था दूर गेली नाही. काळानुसार शेती व शेतकऱ्यांमध्ये जसजसा बदल होत गेला तसतसे येथेही बदल होत गेले. शेतकऱ्यांसाठी व्यवसायिक गाळे बांधले, शेतकी प्रदर्शन भरवले जाते. या ट्रस्टचा कारभार शासकीय नियमानुसार चालतो.

ट्रस्टच्या वतीने जे जे बांधकाम केले ते रितसर शासकीय सर्व परवानग्या घेवून केले. नगरपालिकेचा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेण्यात आला आहे. कोणतेही काम नियमबाह्य केले नाही. न्यायालयाचा कोठेही अवमान केला नाही. तीन ठिकाणी न्यायप्रविष्ट बाब असल्याने काही बाबी उघड बोलता येणार नाही. उपोषण करणारे बाळासाहेब जाधव यांना या सर्व गोष्टींची कल्पना असुनही उपोषण करत आहेत यावरून जाधव हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून शासनाला वेठीस धरत आहेत. ते एक विशिष्ट हेतू मनात ठेवून उपोषण करत आहेत. न्यायव्यवस्थेच्या कामात हस्तक्षेप करत आहे.

 या संदर्भात आमदार आशुतोष काळे यांना  विचारले असता ते म्हणाले की, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा जो काही विषय आहे, तो न्याय प्रविष्ट असल्याने कायदेशीर जे काही असेल ते असेल त्यावर मी सध्या काही बोलणार नाही असे म्हणत या विषयाला बाजूला केले.

 दरम्यान शिंदे यांना माध्यम प्रतिनिधींना प्रश्न केला की, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे किती उत्पन्न आहे? मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग कशा प्रकारे कशासाठी करता? ट्रस्टची एकुण मिळकत किती आहे? या प्रश्नावर ॲड. शिंदे म्हणाले की, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या बाबतीत  न्यायालयीन प्रक्रिया अपुर्ण असल्याने हि बाब न्याय प्रविष्ट आहे, असे म्हणत त्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. 

 माञ न्याय प्रविष्ट बाब असताना बोलुन शकत नाहीत, तर नवीन काॅलसेंटर अथवा नव्याने बांधकाम कसे करता यावर माञ ते म्हणाले की, आम्ही बांधकाम करण्याच्या परवानग्या रितसर घेत आहेत. काही मिळाल्या तर काही मिळणार आहेत त्यामुळे बांधकाम करतोय असे म्हणुन ट्रस्टची बाजू भक्कमपणे मांडत संबंधीत जागा व जागेवरील सर्व काही रितसर चालु असल्याची खाञी माध्यम प्रतिनिधींना दिली.