डाउच बुद्रुक येथे आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल अभियानाअंतर्गत तालुक्यातील मौजे डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी सुमारे ६२ लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर केली त्याचे उदघाटनाचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे व त्यांचे सहका-यांनी ग्रामपंचायत प्रशासनांस विश्वासात न घेता सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी ठरविला आहे.

सदर कार्यक्रम आम्हांस मान्य नसुन त्यास आमचा विरोध आहे अशा आशयाचे निवेदन सरपंच सौ. शोभा मच्छिंद्र माळी व उपसरपंच दत्तात्रय किसन दहे यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिले असुन वेळप्रसंगी सदर कार्यक्रमांस काळे झेंडे दाखविणार असल्याचेही सर्व सदस्यांनी सांगितले. 

           याबाबतची माहिती अशी की, डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीने रहिवासीयांना पिण्यांच्या पाणी मिळावे यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन ६२ लाख रूपये खर्चाची योजना मंजुर केली त्यात आमदार आशुतोष काळे यांचा कुठलाही संबंध नाही, त्यांनी या योजनेसाठी पाठपुरावा देखील केलेला नाही केवळ प्रसिध्दीसाठी त्यांनी सदर योजनेचे भुमिपुजन-उदघाटन करण्यांचा सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी घाट घातला आहे.

गांवचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या नात्यांने त्यांनी कुणालाही विश्वासात न घेताच परस्पर कार्यक्रम ठरविला. आमचेवर हा कार्यक्रम लादू नये असेही निवेदनांत म्हटले आहे. या कार्यक्रमांस गांवचे सर्व पदाधिकारी, रहिवासी नागरीक काळे झेंडे दाखविणार आहे असे सर्वश्री. बाबासाहेब धर्माजी दहे, अमोल भगवान होन, धर्मा गणपत दहे, भाउसाहेब विठोबा दहे, एकनाथ भिकाजी बढे, धर्मा भागवत दहे, एकनाथ नामदेव माळी, मच्छिंद्र गोपिनाथ माळी, बबनराव मोहन माळी, जालींदर धर्मा दहे, संतोष सोमनाथ गायकवाड, शिवाजी भिमराव गायकवाड आदींनी म्हटले आहे.