कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : ग्रामीण भागातील महिला इतर व्यवसायाच्या तुलनेत शिलाई व्यवसायाला जास्त महत्त्व देतात इतर कामांचे नियोजन करून महिलांना या व्यवसायातून आर्थिक लाभ मिळतो मात्र आधुनिक फॅशनच्या दुनियेत नव नवीन फॅशन डिझायनर कपड्यांना महत्त्व आल्यामुळे महिलांना हा आधुनिक बदल स्वीकारून नवीन फॅशनचे प्रशिक्षण घेणे हे गरजेचे झाले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नितीनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था, पोहेगाव ग्रामपंचायत व मोनीली फॅशन डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने लेडीज शिवणकाम प्रशिक्षणाच्या सेमिनार मध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी शिवनाथ बोरनारे, सौ.सोनाली आगलावे, पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, विलास रत्ने, सरपंच अमोल औताडे, प्रशांत रोहमारे अदीसह प्रशिक्षणासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पंजाबी ड्रेस, ब्लाऊज, कुर्ता शीवणकाम 2 दिवसाचे प्रशिक्षण सेमीनार पोहेगांवात आयोजित केलेले होते. यामध्ये पुणतांबा, शिर्डी, राहाता व परीसरातील 120 महिलांनी भाग घेतला. ग्रामीण भागातील महिलादेखील मोठया प्रमाणात सुशिक्षित झालेल्या असुन टी.व्ही व सोशल मिडियामुळे महिला नवनवीन फॅशनकडे आकर्षित होत असतात. महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या व नोकरी निमित्ताने शहरामध्ये जाणऱ्यामुलींना पारंपारीक कपडे परीधान करण्यात संकोच वाटतो. त्यामुळे या सर्व महिला कपडे शिवण्याकरीता शहरातील टेलरकडे जातात.
परीणामी ग्रामीण भागातील टेलरींग काम करणाऱ्यांना काम मिळत नाही. तसेच आर्थिक अडचणींमुळे आधुनिक फॅशनचे प्रशिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथेच विनामुल्य प्रशिक्षण सेमीनार आयोजीत केले असल्याचेही नितिनराव औताडे यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबिरात फॅशन डिझाईन फर्मचे शंकर बोरनारे यांनी महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांना मोफत शिलाईचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल नितिनराव औताडे यांचे महिलांनी आभार मानले.