श्रावणबाळ, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ५२३ प्रस्तावांना नव्याने मंजुरी- बेरड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे ४१७ तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १०६ अशा एकूण ५२३ प्रस्तावांना नव्याने मंजुरी देण्यात आल्याची माहिती योजनेचे प्रभारी नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली.

      योजनेची तालुका स्तरिय समिती सध्या अस्तित्वात नसल्याने तहसीलदार छगनराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नव्याने दाखल झालेले ७०२ प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आले होते. पैकी ५२३ प्रस्तावांना नव्याने मंजुरी देण्यात आली असून अपात्र ठरलेल्या १७९ प्रस्ताव धारकांना त्यांच्या अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या सूचना लेखी पत्रांद्वारे  देण्यात येणार आहेत.

        शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचे तालुक्यात ३ हजार ०२५ सर्वसाधरण तर अनुसूचित जातीचे ५७६, अनुसूचित जमातीचे ०२५, संजय गांधी निराधार योजनेचे १० हजार २०८  सर्वसाधारण  तर अनुसूचित जातीचे १ हजार ६२७, अनुसूचित जमातीचे ७५, इंदिरागांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजेनेचे ५ हजार २१०, तर इंदिरागांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे १०, असे एकूण २० हजार ७५६ लाभार्थी असून शासनाच्या वरील योजनेच्या लाभ धारकांना महिन्याकाठी  २ कोटी ७५ लाख ६  हजार रुपयांचे अनुदान वितरीत होत असून माहे ऑगस्ट २०२२ अखेर तालूक्यातील योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम  संबधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे नायब तहसीलदार बेरड यानी सांगितले.   

 तालुक्यातील काही राष्ट्रीयकृत बँकेकडून शासनाच्या वरील योजनेच्या लाभधारकांना सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याबाबत सर्व संबंधित बँकाच्या अधिका-यांची विशेष बैठक तहसील कार्यालयात तहसीलदार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( दि.४ ) आयोजित करण्यात आल्याची माहिती योजनेचे समन्वयक शशिकांत देऊळगावकर यांनी सांगितले.

योजनेच्या तालुक्यातील सर्व लाभार्थ्याकडून त्यांच्या हयातीचे दाखले सादर करण्याची मोहीम सध्या सुरु असून त्यासाठी सर्व संबधितांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शेवगाव, घोटण, एरंडगाव, खानापूर, बोधेगाव, बालमटाकळी, दहीगाव, शहरटाकळी, भातकुडगाव, ढोरजळगाव आदी प्रमुख मध्यवर्ती ठिकाणी विशेष बैठकी पार पडल्या असून सुमारे ८ हजार १०० लाभार्थ्यांकडून त्यांच्या हयातीचे दाखले संबधित विभागाकडे प्राप्त झाले असून उर्वरित लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले मुदतीत तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात  सादर करण्याचे आवाहन ततहसीलदार वाघ, नायब तहसीलदार बेरड यानी केले आहे.