समताच्या कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांचे बोनस, सानुग्रह, अनुदान वाटप – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.५ : समता नागरी सहकारी पतसंस्था ही सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या हिताचे आणि सोयीचे निर्णय घेणारी महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची पतसंस्था असून आर्थिक दृष्टीने देखील समताची घोडदौड सुरू आहे. या सगळ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना समताचा कर्मचारी देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. समताच्या योजना आणि उपक्रमांचा ज्या प्रमाणे सभासद, ठेवीदारांना फायदा होत असतो, त्याचप्रमाणे संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देखील त्या योजना आणि उपक्रमाचा कसा फायदा करून देता येईल त्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ सतत प्रयत्नशील असते. दसरा, दिपावली यांसारख्या सणानिमित्त बोनस, सानुग्रह अनुदान दिले जात असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.

      अधिक माहिती देताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा म्हणाले की, या वर्षी संस्थेची आर्थिक घोडदौड पाहता दसरा, दिपावली निमित्त समताच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ३० टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान दसऱ्याच्या आदल्या दिवशीच देण्यात आले. समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदानापोटी दीड कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने या दिलेल्या रकमेचा चांगल्या पद्धतीने विनियोग करून आपल्या कुटुंबा समवेत दसरा आणि दिवाळीचा सण साजरा करावा.

      प्रसंगी मुख्य कार्यालयातील ठेव विभाग प्रमुख संजय पारखे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आणि संचालक मंडळ यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देऊन दसऱ्याच्या आदल्या दिवशीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिली. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळाचे आम्ही सर्व कर्मचारी आभारी आहोत. पुढील काळातही संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आणि कर्तव्य निष्ठेने दिलेली जबाबदारी पार पाडू.

      समता नागरी सहकारी पतसंस्थेने कर्मचाऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने गृह कर्ज आणि वाहन कर्ज दिलेले आहे. तसेच संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कामकाजातील बदलत्या पद्धती विषयी माहिती व्हावी यासाठी वर्षातून दोन वेळेस प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. समताचा एखादा कर्मचारी शिक्षणाची पदवी पूर्ण नसेल पण, समता देत असलेल्या प्रशिक्षणामुळे कोणत्याही बँकेतील किंवा पतसंस्थेमधील शाखाधिकारी करेल असे काम समताचा कर्मचारी करत आहे. 

  या वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेला बोनस आणि सानुग्रह अनुदान यामुळे समताचा प्रत्येक कर्मचारी हा आनंदीत असून समता पतसंस्थेमध्ये आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरात एक प्रकारे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे, ज्येष्ठ संचालक जितूभाई शहा, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, मुख्य कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.उ पस्थितांचे आभार कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी आप्पा कोल्हे यांनी मानले.