स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या निधनाने अध्यात्म संस्काराचा ठेवा हरपला – स्नेहलता कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : तपोनिधी आनंद आखाडा पंचायती व गुरूकुल सेवा संस्थेचे प्रमुख महंत स्वामी सागरानंद सरस्वती (वय ९० ) यांच्या निधनाने अध्यात्म संस्काराचा ठेवा हरपला अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी शोक व्यक्त करत त्यांना संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने श्रध्दांजली वाहिली.

स्व. सागरानंद सरस्वती यांच्या निधनाने ईश्वर घनसावंगी (जालना) येथील तुळजाभवानी संस्थानचे श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती महाराज यांच्यासह सर्व भक्तांना सहनशक्ती देवो असेही त्या म्हणाल्या. त्रंबकेश्वरचा कुंभ मेळा आणि त्याचे समग्र नियोजनांत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कोपरगांव पंचक्रोशी संतभूमीच्या विकासातही त्यांचे मौलीक मार्गदर्शन होते. यावेळी कोकमठाण रामदासीबाबा भक्त मंडळाच्यावतींनेही त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. 

           महंत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आणि कोकमठाणचे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांचे एक अतुट नाते होते. ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या षोडशी विधीची संपुर्ण तयारी स्वतः स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आणि सरलाबेटाचे महंत नारायणगिरी महाराज यांनीच सांभाळली होती. प्रत्येक चार्तुमास सत्संग सोहळयात ब्रम्हलिन संत रामदासीबाबा, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, नारायणगिरी महाराज, फौजदारबाबा, लखनगिरी महाराज यांच्यासह कोकमठाण पंचक्रोशीतील सर्व संत महंत यांचा मेळा भरत असे. 

         तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथे ब्रम्हलिन संत रामदासीबाबा उर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी साजरा होतो त्यात स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांचे विशेष योगदान होते. रामदासीबाबा भक्त मंडळ आणि नेवासा येथील रंगनाथ किसन डहाळे सर यांनी ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांच्या जीवन कार्यावर तयार केलेल्या कृष्णा गोदाकाठचे योगी रामदासीबाबा, तीनखणीचा रामानुभव, रामदासीबाबा आणि समर्थविचारधारा या तीनही पुस्तकांचे सन २०१८ ते २०२० मध्ये प्रकाशन स्वामी सागरानंद सरस्वती महाराज आणि महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले त्याकार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले असेही कोल्हे म्हणाल्या.

          स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांना देशभरातील विविध धार्मीक संस्था, आखाडे, यासह वाराणसी विद्यापीठाचे अलौकिक पुरस्कार मिळालेले आहेत. वनौषधीच्या माध्यमातून त्यांनी असंख्य भक्तांचे आजार दूर केले.