विविध मागण्यासाठी येत्या १७ व१८ तारखेला राज्यातीत ऊसतोड व वाहतूक बंद – फुंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : ऊस उत्पादक शेतक-यांच्या  विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी येत्या १७ व १८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड व ऊस वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या आंदोलनात तालुक्यातील  सर्व शेतक-यांनी  सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केले आहे. 


या संदर्भात संघटनेच्या मागण्यांचे निवेदन मंगळवारी ( दि. १५ ) सर्व संबधितांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अध्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती त्वरित मागे घेवून येत्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा नव्याने दुरुस्ती करून एकरक्कमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तो पर्यत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उता-याच्या आधारावर यंदाच्या सन २०२२-२३ च्या हंगामामध्ये एक रकमी एफआरपी द्यावी, मागील २१-२२ च्या हंगामात गाळप केलेल्या ऊसाला  एफआरपी + २०० रु . अंतिम भाव मिळावा. राज्य सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत. 

           स्व.गोपीनाथ मुंढे महामंडळामार्फतच ऊस तोड मजूर पुरवावेत .जो पर्यंत हा निर्णय होणार नाही तो पर्यंत शेतक-यांच्या ऊस बिलातून अथवा कारखान्याकडून  वर्गणी वसूल करू नये, आदी प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनासंदर्भात परिसरातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी, व प्रशासकीय अधिका-यांना त्यांनी आपआपल्या कारखान्यातील ऊस तोड व ऊस वाहतूक या दोन दिवशी बंद ठेवण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासमवेत त्यांची समक्ष भेट घेवून याबाबत आवाहन करण्यात येणार असल्याचेही जिल्हा उपाध्यक्ष फुंदे यांनी  यावेळी स्पष्ट केले.