लोकन्यायालयात १८४९ प्रकरणे काढली निकाली, तब्बल एक कोटी ९ लाख रु.ची झाली वसूली
शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : न्यायालय समाजाभिमुख असल्याचे अनोखे प्रत्यंतर येथील न्यायाधीश श्रीमती संजना जागूष्टे यांनी घडविले आहे. शेवगाव न्यायालयात नुकतेच लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंगरूळच्या पारूबाई झिरपे यांचे वाटपाचा दावा तडजोडीसाठी माननीय न्यायालया पुढे आला असता, त्या कोर्टाच्या आवारात गाडीत होत्या. काही दिवसा पूर्वी झालेल्या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या.
त्यांचे पाय मोडल्याने दोन्ही पायांना प्लॅस्टर केलेले असल्यामुळे त्या कोर्टासमोर उभ्या राहू शकत नव्हत्या. ही वस्तुस्थिती त्यांच्या वकीलांनी न्या. जागुष्टे यांच्या कानी घातली. तेव्हा ‘न्यायालय पक्षकारासाठी आहे ‘ असे म्हणून त्या आसन सोडून बाहेर थेट पारूबाईच्या गाडी जवळ गेल्या. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि तडजोडीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. न्यायालयाच्या आवारात व पक्षकारात आजही या घटनेची चर्चा रंगत आहे.
लोक न्यायालयात दाव्याचा निकाल झटपट लागतो. न्यायालयात हेलपाटे मारावे लागत नाहीत. यात होणारा निवाडा हा अपसात समजुतीने होत असल्याने कटुता न येता दोन्ही पक्षांना समाधान मिळते. आपसातील द्वेष वाढत नाहीत आणि विशेष म्हणजे लोक न्यायालयाच्या निकाला विरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात न्यायालयाच्या दगदगीतून सुटका होते. सर्वांचाच वेळ आणि पैसा देखील वाचतो. म्हणून जास्तीत जास्त पक्षकारांनी लोक न्यायालयात सहभाग घ्यायला हवा असे आवाहन न्या. जागुष्टे यांनी यावेळी केले.
शेवगांव न्यायालयात रविवारी लोकन्यालयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ५७ दिवाणी प्रकरणे, २९ फौजदारी प्रकरणे तसेच १७५o दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली व जवळपास तब्बल एक कोटी ८ लाख ८२ हजार २२६ रुपये वसूल करण्यात आले.
यावेळी न्यायाधीश श्रीमती-संजना जागुष्टे व न्या. श्रीमती एम. ए. बेंद्रे यांनी काम पहिले. तालुका विधी सेवा समितीचे सुधीर काकडे व न्यायालयीन सेवक वृंद, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड के. के. गलांडे , उपाध्यक्ष अॅड गणेश ताठे, अॅड .बी. आर. शिंदे, अॅड एम्.ए. देहाडराय, अॅड रामदास बुधवंत, अॅड .एन.के. गरड, अॅड. ए.आर. लबडे, अॅड. एस एस . भारदे, अॅड देशमुख, अॅड.चौधरी, आदिनी मोठे योगदान दिले.
–