नागपुर समृध्दी महामार्गाची प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करा – माजी आमदार कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १९ :  कोपरगांव तालुक्याच्या पंचक्रोशीतील दहा गावांच्या हददीतुन नव्यांनेच तयार होणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे वीस टक्के अपूर्ण कामामुळे कोकमठाणवासियांच्या अडचणीत भर पडली आहे.

त्याचप्रमाणे शेतक-यांनाही मोठा फटका बसला आहे, कोकमठाण गांवासाठीच्या पिण्यांच्या पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी या कामात दबली गेली ती अन्यत्र हलवुन हे काम हे वेळेत पुर्ण झाले नाही तर कोकमठाण गांवचा पिण्यांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण होईल तेंव्हा या महामार्गाची कोकमठाणसह अन्य गावातील सर्वच प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करावीत अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या कडे केली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी अहमदनगर येथे पार पडली त्यात स्नेहलता कोल्हे बोलत होत्या, 

कोल्हे म्हणाल्या की,  नागपुर मुंबई समृध्दी महामार्गाचे कोपरगांव पंचक्रोशीतील दहा गावांचे हददीत अजुनही बरेच काम बाकी आहे, या मार्गावरून वाहतूक चालू झाल्यास प्रलंबित सर्वच कामे तशीच पडून  राहतात आणि त्यातून अपघाताचे प्रमाण वाढते, याठिकानी ड्रेनेजची व्यवस्था नसल्यांने आसपासच्या शेतक-यांचे चालु खरीप हंगामात मोठे नुकसान झाले. महामार्गावरील भरावाचा खळगा आसपासच्या सुपीक शेतात पसरल्याने नापिकीचे प्रमाण वाढले आहे.

महामार्गाच्या कामामुळे एकाच शेताचे दोन ठिकाणी विभाजन झाले त्यातुन शेतमालाची ने आण करतांना रस्त्याचा प्रश्न भेडसावत आहे, परतीच्या पावसाच्या पाण्याचा धुमाकूळ प्रचंड प्रमाणात कोकमठाण शिवारात झाला परिणामी कोकमठाण पंचक्रोशीतील शंभर टक्के शेतक-यांचे सोयाबीन, मका, कापूस, बाजरी, आदि खरीप पिकासह उस, फळे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले तेंव्हा या महामार्गावरील कोकमठाणसह अन्य गावातील सर्वच ड्रेनेज व्यवस्था प्रभावीपणे दुरुस्ती व सीडी वर्कची कामे करावी, महामार्गाच्या दोन्ही बाजुने पर्यायी मार्ग आहेत ते समृध्दीने ताब्यात घेवुन त्यावर लोखंडी सुरक्षा तारेचे कम्पाउंड घालण्यांचे काम चालु केले आहे.

शेतक-यांना शेतात ये-जा करण्यांसाठी रस्ते नाही, कडेचा शेतकरी पुढच्या शेतक-याला रस्ता देत नाही, त्यातुन मोठया प्रमाणांत गांवोगांव वाद तयार झालेले आहेत. जे चांगले, कच्चे तसेच शिवार वाहतुकीचे व खडीचे रस्ते होते त्यावर समृध्दीच्या अवजड वाहतुकीमुळे सर्वच रस्त्यांचे वाटोळे झाले आहे, त्यातुन अपघातांचे प्रमाण वाढले आहे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी.

         समृध्दी उडडाण पुलाखाली दिवाबत्ती नसल्यांने चो-या, दरोडे पडुन सुरक्षीत प्रवासास अडथळा ठरणार आहे तेंव्हा संबंधीत ठिकाणी दिवाबत्तीची सोय करावी. नागपुर मुंबई समृध्दी महामार्ग तयार करतांना अनेकांच्या जमीनी जाउन प्रकल्पबाधीतांची संख्या वाढली त्यांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावे असेही कोल्हे म्हणाल्या.