अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भाजपकडून नगर परिषदेला सादर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दीतील खडकी भागातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना शासनाकडून अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येऊन ती कागदपत्रे भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आली.   

           कोपरगाव शहर आणि तालुक्यात १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्री प्रचंड पाऊस पडला. कोपरगाव शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. कोपरगावच्या इतिहासात यापूर्वी झाला नव्हता इतका जोरदार पाऊस या दिवशी झाला आणि या अतिवृष्टीने अनेक घरांमध्ये पाणी घुसून नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतशिवारातील पिकांचेदेखील अतोनात नुकसान झाले. या अतिवृष्टीने खडकी, गोकुळनगरी, कर्मवीरनगर, शिक्षक कॉलनी, ब्रिजलालनगर, समतानगर, शारदानगर, संजयनगर, खंदक नाला आदी भागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्यामुळे मोठे नुकसान झाले. 

          या नैसर्गिक आपत्तीने नागरिक हवालदिल झालेले सर्वात प्रथम संजीवनी उद्योग समूह आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अतिवृष्टीची झळ बसलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. 

           भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक व कार्यकर्त्यांनीही भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान यांच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्तांना मदत केली.                  या भागातील नागरिकांचे पावसाने अतोनात नुकसान झाले; प्रशासनाने पंचनामे केले; परंतु अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. 

            याप्रसंगी दीपक जपे, पप्पू दिवेकर, युनूस बागवान, खंडू वाघ, निलेश डोखे, रहीमखा पठाण, समीर पठाण आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या नागरिकांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे व इतर प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून आपद्ग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विवेक कोल्हे, पराग संधान, दत्तात्रय काले, दीपक जपे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.