एस.एस.जी.एम. महाविद्यालयात स्टेनो टायपिंग कोर्स सुरू

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : शासकीय सेवेकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर ओढा असला तरी त्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना प्राप्त नसते. हे लक्षात घेऊन येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात टायपिंग व स्टेनो कोर्स सुरू करण्यात आला आहे.

सहा महिने कालावधीच्या या कोर्सचे उद्घाटन नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या अध्यक्षतेखाली आणि संकल्प फाउंडेशनचे सचिव श्री. जावेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी श्री जावेद शेख यांनी
सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासू, कष्टाळू व जिद्दी असतात. परंतु व्यक्तिमत्व विकास व स्वतंत्र व्यवसायासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा त्यांच्याकडे अभाव असतो.

विद्यार्थ्यांना अशा कौशल्यांचे शिक्षण देऊन स्वयंपूर्ण करणे ही काळाची गरज बनली आहे. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून त्यांना काळानुरूप शिक्षण देणे हे रयतचे वैशिष्ट्य आहे. त्याला अनुसरून एस. एस. जी. एम. महाविद्यालयाने सुरू केलेला हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा
अवश्य लाभ करून घ्यावा.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची व त्याद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली. त्याचबरोबर, आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी शिक्षणावर थांबून चालणार नाही; तर त्याच्या जोडीने विविध कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी त्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी अशा जागरूकतेने अभ्यास करतात ते परिश्रम व जिद्दीच्या बळावर यशस्वी होतात. त्यामुळे तुम्ही काबिल बना, कामयाबी आपोआप तुमच्या मागे येईल, असे विविध उदाहरणे देऊन पटवून दिले.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य,सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक,क्रीडा शिक्षक,महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.