कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र प्रगतीपथावर असलेल्या अनेक विकास कामांना मागील काही आठवड्यांपासून गौण खनिज तुटवडा जाणवत असून खडीचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
त्यामुळे सद्यस्थितीला हि विकास कामे थांबलेली असून या विकास कामांना गौण खनिज व खडीचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
दिलेल्या निवेदनात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव मतदार संघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून कोपरगाव शहर, ग्रामीण भाग व मतदार संघात अनेक विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे सुरू आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारती, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थान, धार्मिक स्थळे, दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते निर्मिती व दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.
ही कामे मागील काही दिवसापासून गौण खनिज व खडीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. हि विकासकामे थांबली असल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत असून त्याबाबत नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे. या संदर्भात संबंधित ठेकेदारांकडून माहिती घेतली असता गौण खनिज व खडी मिळत नसल्यामुळे कामे थांबली असल्याचे सांगण्यात आले.
त्यावेळी इतर जिल्ह्यात गौण खनिज पुरवठ्याबाबत माहिती घेतली असता त्या जिल्ह्यात गौण खनिज व खडीचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून अपेक्षित असलेला गौण खनिज व खडीचा पुरवठा वेळेवर होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातच खडीचा पुरवठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरु असलेल्या विकासकामांवर याचा मोठा परिणाम होवून विकास कामे थांबली आहेत. गौण खनिज व खडीचा पुरवठा होत नसल्यामुळे दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांची प्रगतीपथावर असलेली कामे देखील थांबली आहेत.
हि सर्व विकासकामे केवळ गौण खनिज पुरवठा होत नसल्यामुळे थांबली असून शासनाप्रती नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होत आहे त्यामुळे याबाबत तातडीने बैठक घेवून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांकडून जनआंदोलन व उपोषण केले जावू शकते.
या सर्व परिस्थितीचा आपण गांभीर्याने विचार करून गौण खनिज व खडीच्या होत असलेल्या अनियमित पुरवठ्याबाबत तातडीने बैठक घ्यावी. व त्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.