शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा काढलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भाकपचे जिल्हा सचिव कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंत्री पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून शेवगावच्या क्रान्ती चौकात दहन करुन आपला संताप व्यक्त केला.
यावेळी भाजपा व मंत्री पाटील यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. भाजपावर टीका करतांना नांगरे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनुवादी व धर्मांध सरकार राज्यात व देशात आल्याने महापुरुषांच्या बदनामीचे कटकारस्थान जाणीवपूर्व केले जाते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपतींचा, ना. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा तसेच छिंदम सारख्या भाजपाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी वेळोवेळी देशाच्या महापुरुषांचा अवमान केला आहे. आज पुतळा जाळला. नामदार पाटील तालुक्यात फिरकले तर त्यांची गाडी जाळण्यात येईल अशी धमकीही नांगरे यांनी यावेळी दिली.
यावेळी कॉ, योहान मगर, रत्नाकर मगर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, तालुकाप्रमुख अविनाश मगरे, राजेंद्र मगर, विश्वास हिवाळे, शेखर तिजोरे, राजू मगर, जेम्स कोल्हे ,आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.