संत रामदासी महाराजांचा ९ ते १६ जानेवारी दरम्यान ३३ वा पुण्यतिथी सोहळा

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमीत्त किर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन ९ ते १६ जानेवारी पर्यंत करण्यांत आले असल्याची माहिती समस्त रामदासी बाबा भक्त मंडळ, भजनी मंडळ तिर्थक्षेत्र कोकमठाण येथील गांवक-यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली.

            १६ जानेवारी रोजी त्रंबकेश्वर येथील आनंद आखाडयाचे श्री श्री १००८ गणेशानंद सरस्वती महाराज, सज्जनगडाचे माजी व्यवस्थापक व खातगांव कर्जतचे कार्याध्यक्ष समर्थभक्त मोहनबुवा रामदासी, आदि संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत सरलाबेटाचे उत्तराधिकारी महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने याची सांगता होईल.

            तपोनिधी आनंद आखाडा (वाराणशी) व गुरूकुल सेवा संस्था त्रंबकेश्वर येथील ब्रम्हलिन स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या कार्य व्यासंगावर नेवासा येथील सेवानिवृत्त शिक्षक रंगनाथ किसन डहाळे सर व रामदासीबाबा भक्त मंडळ कोकमठाण यांनी तयार केलेल्या भक्तीचा सागरानंद या पुस्तकाचे प्रकाशन १६ जानेवारी रोजी होत आहे. 

            त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, या सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडआरती, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ व रात्री ७ वाजत किर्तन व दैनंदिन जागर याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. 

            या कार्यक्रमांसाठी हभप सोमनाथ महाराज तळेकर, हभप मंगेश महाराज खैरनार मृदुंगाचार्य तर गायनाचार्य हभप रामभाउ महाराज चौधरी, हभप अरूणभैय्या पगारे तर हभप तुकाराम महाराज वेलजाळे यांची व्यासपीठ चालक म्हणून साथ लाभत आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते कलश व ग्रंथ पुजनाने या पुण्यतिथी सोहळयाचा शुभारंभ होत आहे. 

            हभप निवृत्ती महाराज ठाणगांवकर (९ जानेवारी) हभप बाळासाहेब रंजाळे (१० जानेवारी), स्वामी काशिकानंद महाराज (११ जानेवारी), हभप दिपक महाराज देशमुख (१२ जानेवारी), हभप किशोर महाराज खरात (१३ जानेवारी), हभप उध्दव महाराज मंडलिक (१४ जानेवारी) व हभप परशुराम महाराज अनर्थे (१५ जानेवारी) यांची दररोज सायंकाळी ७ वाजता किर्तनमालिका होईल. 

          १५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत प. पू. रामदासी महाराज यांची प्रतिमा व ग्रंथ मिरवणुक काढण्यांत येणार आहे. या सप्ताह काळात स्वामी शिवानंदगिरी महाराज (मंजुर), जंगलीदास माऊली. रामानंदगिरी महाराज (पुणतांबा), अरविंद महाराज, गणेशानंद महाराज (जालना), प्रसादबुवा रामदासी (खातगांव), महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज (कुंभारी), रामदास महाराज वाघ, भगवतानंदगिरी महाराज (कोकमठाण), महेंद्रपुरी महाराज (हनुमान टेकडी), श्रध्दानंद महाराज (महांकाळ वाडगांव), मुकुंद महाराज (भगुरकर), गणपत महाराज लोहाटे (कोपरगाव), विठठलानंद महाराज (कारवाडी) आदि संत-महंतांची प्रामुख्यांनी उपस्थिती राहणार आहे. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व कोकमठाण येथील रामदासी महाराज भक्त मंडळ प्रयत्नशिल आहेत.

           १६ जानेवारी रोजी रामदासी महाराज समाधीस्थानावर जय जनार्दन फोटो स्टुडीओचे मालक दत्तात्रय ज्ञानेदव गायकवाड (संवत्सर) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली दत्तात्रय गायकवाड या उभयतांच्या हस्ते लघु रुद्राभिषेकाचे सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत आयोजन करण्यांत आले आहे. तेंव्हा भाविकांनी या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.