अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट
कोपरगाव प्रतिनिधी दि.२९ : कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार आशुतोष काळे गटाच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारली असुन तब्बल १५ ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता काबीज करुन कोल्हे गटाला मोठा धक्क दिला आहे. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी काळे गटाच्या ताब्यातील काही ग्रामपंचायती आपल्या ताब्यात खेचुन काळे व परजणे गटाला धक्का दिला आहे.
काळे यांनी आमदारकीच्या सत्तेतून केलेल्या विकासकामामुळे तालुक्यातील २६ ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी १५ ग्रामपंचायतीवर विरोधी कोल्हे गटाला चपराक दिली. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे गटाला ९ ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले. तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेनेचा सरपंच तर एका ठिकाणी अपक्ष सरपंचाची वर्णी लागली.
सर्वाधिक सदस्य आमदार काळे गटाचे निवडणून आले. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तातर झाले, तर काही ठिकाणी सरपंचपद मिळाले, पण सत्ता गेली अशी अवस्था दोन्ही गटाची झाली आहे. स्थानिक गावपातळीवरील राजकारणात काही ठिकाणी काळे-कोल्हे यांची छुपी युती झाली तर काही ठिकाणी परजणे गटाने काळे कोल्हे यांच्या बरोबर युती करून गावपातळीवरील राजकीय वातावरण तापवले होते. एका ग्रामपंचायत मध्ये कोल्हे गट विरुद्ध कोल्हे गट अशी लढत झाली. शिवसेनेने अनेक ठिकाणी दोन्ही गटाला छुपा पाठिंबा दिला होता.
दरम्यान बहादरपूर ग्रामपंचायती मध्ये वीस वर्षाची कोल्हेची सत्ता काळे गटाने उधळून लावली. तर खिर्डी गणेश येथील परजणे गटाची वीस वर्षाची सत्ता कोल्हे गटाने उधळून लावली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचे मतमोजणी आज सकाळी दहा वाजता सुरु झाली.
एकूण ९ टेबलावर ११ फेऱ्याच्या माध्यमातून दुपारी अडीच वाजेपर्यंत सर्व निकाल घोषित करण्यात आले. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. विजयी उमेदवारांनी गुलालांची उधळण करत जल्लोष व्यक्त केला. धारणगाव येथील अण्णासाहेब रणशूर तर हंडेवाडी येथील रंजना पुरी यांची चिठ्ठीद्वारे सदस्यपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
ग्रामपंचायत निहाय निवडणून आलेले सरपंच व गटनिहाय सदस्य पुढील प्रमाणे –
| अनुक्रमांक | ग्रामपंचायत | सरपंच | सदस्य |
|---|---|---|---|
| १ | शिंगणापूर | सरपंच डॉ. विजय काळे (कोल्हे गट ) | काळे गट – ३, कोल्हे -१४ |
| २ | सडे | सरपंच आशाबाई सुर्यभान बारहाते (काळे गट) | काळे ५, कोल्हे २ दहा वर्षाने झाले सत्तांतर |
| ३ | भोजडे | सरपंच मधुकर वादे (काळे गट) | काळे गटाच्या ९ सदस्यांनी एक हाती सत्ता मिळवली |
| ४ | खिर्डीगणेश | सरपंच चंद्रकांत बाबुराव चांदर ( कोल्हे गट) | कोल्हे गटाचे ८ सदस्य, तर परजणे गटाला केवळ १ जागा मिळाली. वीस वर्षाची सत्ता परजणे गटाने गमावली. |
| ५ | कोळपेवाडी | सरपंच चंद्रकला सुर्यभान कोळपे (काळे गट) | काळे गट ९ , कोल्हे गट ४ |
| ६ | माहेगाव देशमुख | सरपंच सुमन ज्ञानदेव रोकडे (काळेगट) | काळे गट १०, कोल्हे गट १ |
| ७ | शहापूर | सरपंच योगीता घारे (काळे गट) | काळे गट ३, कोल्हे गट ४ |
| ८ | वडगाव | सरपंच संदीप मधुकर सांगळे (काळे गट) | काळे गट ६, कोल्हे गट १, |
| ९ | वेस सोयगाव | सरपंच – जया प्रकाश माळी (अपक्ष) | काळे गट ५, कोल्हे गट २ व अपक्ष २ सदस्य |
| १० | चांदेकसारे | सरपंच किरण विश्वनाथ होन (काळे गट) | काळे गट ११, कोल्हे गट २ |
| ११ | पढेगाव | सरपंच मिना बाबासाहेब शिंदे (काळे गट) | काळे गट ३, कोल्हे गट ६ |
| १२ | मोर्वीस | सरपंच सविता जनार्दन पारखे (काळे गट) | काळे गट ५, कोल्हे गट २ |
| १३ | डाऊच खु. | सरपंच स्नेहा संजय गुरसळ (शिवसेना) | शिवसेना ठाकरे गट ६, काळे गट २, परजणे गट १ |
| १४ | बहादरपूर | सरपंच गोपीनाथ पाराजी रहाणे (काळे गट) | काळे गट ६, कोल्हे गट ३ वीस वर्षांनंतर सत्तांतर झाले. |
| १५ | डाऊच बु. | दिनेश गायकवाड (काळे गट) | काळे गट ६, कोल्हे गट १, |
| १६ | देर्डे को-हाळे | सरपंच नंदा दळवी (कोल्हे गट) | काळे गट ५, कोल्हे गट ४ |
| १७ | हांडेवाडी | सरपंच निवृत्ती घुमरे (काळे गट) | काळे १, कोल्हे ६, चिठ्ठीवर कोल्हेचा एक |
| १८ | बक्तरपूर | मुक्ताबाई नागरे (काळे गट) | काळे गट ५, कोल्हे गट २ |
| १९ | बहादराबाद | सरपंच आश्विनी विक्रम पाचोरे (कोल्हे गट) | काळे गट १, कोल्हे गट ६ |
| २० | खोपडी | विठाबाई वारकर (कोल्हे गट) | काळे ४, कोल्हे ३ |
| २१ | सोनेवाडी | सरपंच शकुंतला गुडघे (कोल्हे गट) | कोल्हे परजणे ९, काळे ४ |
| २२ | चासनळी | सुनिता बनसोडे (काळे गट) | काळे ४, कोल्हे ६, अपक्ष १ |
| २३ | करंजी | सरपंच रविंद्र शिवाजी आगवण (कोल्हे गट) | काळे गट ४ + १ बिनविरोध, कोल्हे गट ६ |
| २४ | तळेगाव मळे | सरपंच आरती टुपके(कोल्हे ) | काळे गट ३, कोल्हे गट ६ |
| २५ | रांजणगाव देशमुख | सरपंच जिजाबाई गजानन मते (काळे गट) | काळे गट १०, कोल्हे गट १ |
| २६ | धारणगाव | सरपंच वरूणा दिपक चौधरी (कोल्हे गट ) | कोल्हे गट ९, काळे गट २ चिठ्ठी वर कोल्हे गटाचा एक सदस्य विजयी झाला. |
| अनुक्रमांक | ग्रामपंचायत | सरपंच | सदस्य |
२६ ग्रापपंचायतीच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे गटाला जनते कौल देवून निवडुन दिले असले तरी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना जनतेने कमी कौल दिला. माञ चिठ्ठीच्या माध्यमातुन कोल्हे गटाचे दोन सदस्य निवडणुकीत भाग्यवान ठरल्याने कोल्हे यांना ईश्वरी कौल मिळाला असल्याची चर्चा तालुक्यात सुरु होती.
