शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : संत गाडगे बाबा यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, त्यांची मुले शिकून मोठी व्हावीत व त्यांच्या कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी आपले आयुष्य समर्पित केले. गोर गरीबांची सर्वागीण प्रगती व्हावी म्हणून संत गाडगे बाबा यांनी अनेक शाळा व वसतिगृह सुरु करून आकाशाला गवसणी घालण्याचे काम केले. त्यांच्या या समाज कार्यापासून आजच्या युवकांनी प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधिज्ञ शिवाजीराव काकडे यांनी येथे केले.
येथील सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या श्री गुरुदत्त सामाजिक विकास प्रतिष्टानचे सचिव, शासकीय ठेकेदार फुलचंद अण्णा रोकडे यांच्या संकल्पनेतून मंगळवारी संत गाडगेबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला. या निमित्ताने येथील संत गाडगे बाबांच्या पुतळ्याच्या परिसरात रोकडे यांच्या वतीने पेव्हिंग ब्लॉक बसवून परिसर सुशोभित करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, संजय फडके, भरत जाधव, संतोष जाधव, निलेश रोकडे, अशोक अदमाने, योगेश रोकडे, किरण सूर्यवंशी, गणेश वाघमारे, रावसाहेब बर्वे, धीरज जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत गाडगेबाबांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुरुदत्त सामाजिक प्रतिष्टानच्या वृद्धाश्रम तसेच वसतिगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्यांचे व फळांचे वाटप करण्यात आले.