कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : महाराष्ट्रात समता पॅटर्नने शैक्षणिक दृष्ट्या उंच भरारी घेतली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी यात यशाची शिखरे गाठलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात घेत असलेल्या या उंच भरारी बरोबरच शारीरिक दृष्ट्या विविध क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहोत. समताच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे नेतृत्व केले असून त्यात करिअर ही केले आहे.
भारतीय जम्प रोप असोसिएशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा मान समता इंटरनॅशनल स्कूल ला मिळालेला आहे. त्यामुळे देशातील खेळाडू कोपरगावात येऊन समताला भेट देणार आहे. ही स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात पहिल्यांदा होत असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला भारतीय जम्प रोप असो.चे समन्वयक अशोक दुधारे, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे सरचिटणीस दिपक निकम, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष दिलीप घोडके, अहमनगर जिल्हयातील सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना भारतीय जम्प रोप असो.चे समन्वयक अशोक दुधारे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १४ वर्षाखालील मुले,मुली राष्ट्रीय फेडरेशन कप साठी आणि १७ वर्षाखालील मुले, मुलींमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत २७ राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहे. स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय जम्प रोप असो.चे सरचिटणीस शहजाद खान यांनी मान्यता दिली असून राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील जम्प रोप असो.च्या बैठका आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी भारतीय जम्प रोप असो.चे सरचिटणीस शहजाद खान, समन्वयक अशोक दुधारे, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे सरचिटणीस दिपक निकम, समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे, कार्याध्यक्ष दिलीप घोडके, सचिव शिवप्रसाद घोडके, जिल्हयातील सर्व पदाधिकारी, सदस्य प्रयत्नशील आहेत.