पत्रकार आगळे यांच्यावर कोयत्याने वार

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : तालुक्यातील भायगाव येथील वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासंदर्भात शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांचे समोर दाखल असलेल्या दाव्याच्या पुढील सुनावणीच्या तारखेला उपस्थित राहू नये अन्यथा तुमचे बरे वाईट करू. आमच्या नादी लागल्यास एकेकाचा खून करू अशी धमकी देऊन कोयत्याने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भायगाव येथे घडली. शेवगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

          या संदर्भात अधिक माहिती अशी की, पत्रकार शहाराम चंद्रभान आगळे ( वय ३९ रा. भायगाव ) यांनी बाबूराव लक्ष्मण सामृत, विजय बाबुराव सामृत यांनी काठीने व कोयत्याने मारहाण केल्याची, तुमचे बरेवाईट करु अशी तक्रार दाखल केली आहे.

आगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आम्हाला आमचे शेतातील घरी व शेतात जाण्यासाठी विजय बाबुराव सामृत यांचे शेताचे बांधावरून जाण्यासाठी रस्ता आहे. परंतु आम्हाला रस्त्यावरून जाणे साठी सामृत नेहमी आमच्याशी वाद घालत असतो. त्यामुळे आम्ही तहसीलदार यांचेकडे कायदेशीर रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला असून सध्या त्यांची कार्यवाही चालू आहे.

      शेवगाव तहसीलदार यांच्याकडे गेल्या २९ एप्रिल २०२२ रोजी रस्ता केस क्रमांक /रस्ता / एस आर /२७/२०२२रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ९ नोव्हेंबरला  तहसीलदार वाघ यांनी देवटाकळीचे कामगार तलाठी प्रदीप मगर यांच्या समक्ष संबंधित रस्त्याचे स्थळ निरीक्षण करून पंचनामा केला.  त्यानुसार ११ जानेवारी रोजी पुढील कारवाईसाठी तारीख देण्यात आली. या तारखेला तुम्ही हजर राहायचे नाही. अन्यथा तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत बाबुराव  सामृत व विजय  सामृत यांनी दत्तू चंद्रभान आगळे व संगीता दत्तू आगळे यांना काठी व दगडाने  मारहाण केली.

यावेळी आपण संबंधित रस्ता केस तहसीलदार यांच्यासमोर चालू आहे. तेव्हा तुम्ही विनाकारण आमच्याशी वाद घालू नका. तुमचे काय म्हणणे आहे ते तहसीलदार यांना सांगा. असे बोलण्याचा राग आल्याने बाबुराव सामृत याने त्याच्या हातातील कोयत्याने माझे उजव्या डोळ्याच्या भुईवर मारून मला जखमी केले त्यावेळी मला सोडविण्यासाठी माझी पत्नी सविता व  भावजयी संगीता मध्ये आल्या असता विजय सामृत याने माझ्या पत्नीच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटावर कोयता मारून जखमी केले. तिच्या तोंडावर हाताने बुक्की मारून जखमी केले.

तसेच माझी भावजई संगीता हिस लाथा बुक्क्याने मारून आम्हा सर्वांना शिवीगाळ दमदाटी करून तुम्ही जर आमचे नादी लागले तर तुमचा एकेकाचा खून करू. असा दम दिला, या झटापटीत माझे भाऊजाईच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गहाळ झाले. त्यानंतर आम्ही सर्वजण शेवगाव पोलीस ठाण्यात आलो. पोलिसांनी आम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी पत्र दिल्याने आम्ही ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार घेण्यास गेलो. औषधोपचारानंतर पोलीस ठाण्यात समक्ष तक्रार दाखल केली, असे म्हटले आहे.