एक दिवस घरकुलासाठी अभियाना अंतर्गत १७८३ लाभार्थ्यापर्यंत पोहोचले प्रशासन

शेवगावात प्रभावी अमंलबजावणी प्रारंभ : गटविकास अधिकारी डोके

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : राज्य शासनाचे ‘अमृत महा आवास अभियान ‘शेवगाव पंचायत समितीनेअत्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार केला असून त्या अंतर्गत पंचायत समितीच्या वतीने ‘एक दिवस घरकुलासाठी’ उपक्रम आज बुधवारी ( दि.२७ ) सुरू करण्यात आला.

या दिवशी पंचायत समितीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी, कर्मचारी तालुक्यातील सर्व ९४ ग्रामपंचायतमध्ये  भेट देऊन लाभार्थ्यांसी संवाद साधला. गटविकास अधिकारी महेश डोके यांनी स्वतः लाभार्थी मेळावे व सभा घेतल्या. वैयक्तिक भेटी देऊन घरकुल बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

आज तालुक्यातील ९४ ग्राम पंचायतीमधील घरकुलाची अपूर्ण कामे असणार्‍या प्रधान मंत्री आवास योजनेच्या एक हजार ३८१ लाभार्थी, रमाई आणि  शबरी आवास योजनेच्या एकूण ४०२ असे दोन्ही मिळून एकूण एक हजार ७८३ लाभार्थ्यां पर्यन्त एकाच दिवशी प्रशासन पोहचले.

     लाभार्थ्यांसी संवाद साधला असता घरकुल मंजूरी नंतर मिळालेला हप्ता घेवून तो इतरत्र अन्य कामांसाठी खर्च करण्यात आल्याचे प्रमाण जास्त असल्याने घरकुल बांधकाम सुरू न करणार्‍या लाभार्थी यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले. अशा लाभार्थ्यांनी पुढील आठ दिवतसात काम  सुरू न केल्यास पैसे वसुल करून घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येईल.

तसेच जे लाभार्थी घरकुल सुरू करणार नाहीत आणि पैसे परत करणार नाहीत त्यांना लोक अदालतीद्वारे नोटिस पाठवून घरकुल रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची ताकीद देण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डोके यांनी यावेळी दिली.

शेवगाव तालुका ग्रामीण मध्ये २०१६-१७ ते २०२१-२२ पर्यन्त प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना मिळून एकूण पाच हजार ९१२ लाभार्थी यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांनी तात्काळ बांधकाम पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन गट विकास अधिकारी डोके यांनी केले आहे.