शेवगावात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगांवात सध्या पिसाळलेल्या कुत्र्यांचा मोठा उच्छाद सुरु आहे. तक्रार देऊनही नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

     मागील आठवड्यात खंडोबा नगर परिसरात  खंडोबा मंदिराच्या जवळ एका  पिसाळलेल्या कुत्र्याने गाईला  चावा घेतला . या गाईला वाचविण्याचे  डॉ. झिरपे यांनी शर्तीचे प्रयत्न केले. डॉ. नीरज लांडे पाटील यांनी तातडीने औषधे पुरवली .तरीही  गाय वाचू शकली नाही.

तर चार दिवसापूर्व मिरी रोडवरील निर्मल नगर परिसरात एक लहान वासरू कुत्र्यांनी अक्षरशः फाडून मारले. येथील तहसील कार्यालयात देखील एक पिसाळलेले कुत्रे जिन्याच्या आश्रयाला थांबले होते. कामानिमित्त येणारे नागरिक आणि कार्यालयात असलेले कार्मचारी आणि अधिकारी त्रस्त झाले होते. ते कुत्रे मारण्यात आल्याने नाकाला रुमाल बांधण्याच्या त्रासापासून सर्वांची सुटका झाली.

पूर्ण गावभर कुत्र्यांच्या प्रचंड झुंडी वाढलेल्या आहेत. यापूर्वी कुत्र्यांनी लहान मुलांवरही हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तरी प्रशासनाने अशा घटना होऊ नये यासाठी कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.