कोपरगावचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा प्रसिद्ध करावा – विधिज्ञ पोळ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती कोपरगाव व शिर्डी बस स्टॅण्ड आणि रेल्वे स्टेशनवर लावावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष विधिज्ञ नितीन पोळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

शिर्डी येथील जागतिक दर्जाच्या साई बाबा समाधीच्या दर्शनाला देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात मात्र एवढया दूर वरून येणाऱ्या या भाविकांना कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती होऊ शकत नाही मात्र कोपरगाव येथील ऐतिहासिक राघोबा दादा यांचा कोपरगाव व हिंगणी येथील वाडा, संत जनार्धन स्वामी, संत जंगली दास महाराज आश्रम, शुकाचार्य व शुक्लश्वर मंदिर,संवत्सर येथील महानुभाव मंदिर, माहेगाव येथील दत्त मंदिर, कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर निसर्गरम्य गोदावरी किनारा व अनेक कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची माहिती फ्लेक्स बोर्ड बनवून कोपरगाव- शिर्डी येथील बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशनवर लावली तर कोपरगावचा हा ऐतिहासिक व धार्मिक वारसा अनेक भाविकांना आकर्षित केल्या शिवाय राहणार नाही.

असे बोर्ड लावले तर अनेक पर राज्यातील भाविक रेल्वे व बसची वाट पहात थांबण्यापेक्षा या स्थळांना भेटी देतील व अनेक बेरोजगार तरुणांना हॉटेल, फूड स्टॉल, चहाची दुकाने रिक्षा आदी व्यवसाय उपलब्ध होतील या साऱ्या गोष्टी चा विचार करून कोपरगाव व शिर्डी बस स्टॅण्ड व रेल्वे स्टेशन येथे कोपरगावच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांच्या माहितीचे बोर्ड लावावे व स्थळांना प्रसिद्धी द्यावी अशी मागणी या पत्रकाद्वारे केली आहे.