शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : मोल करून मजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबाचा एकुलता एक आधार असलेल्या तरुण मुलाचे अचानक निधन झाले. अत्यंत लाघवी व कोणाच्याही मदतीला धावणाऱ्या या तरुणाच्या बेसहारा झालेल्या आईवडिलांच्या आधाराला त्याचा मित्र परिवार उत्तरदायित्वाच्या भावनेतून धावून आला. त्याचा दशक्रीया विधी होण्याच्या आत मित्रपरिवाराने तब्बल एक लाख रुपये एकत्र करुन त्याच्या आई वडिलांचे नांवे कायम ठेव करुन त्यांच्या शाश्वत उत्पन्नाची सोय केली आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल निधनानंतरही मैत्री जपणाऱ्या मित्रपरिवाराचे कौतूक होत आहे.
सामाजिक कार्यात सातत्याने आघाडीवर असलेला शेवगाव येथील मच्छिंद्र रामभाऊ भडके या तरुणाचे आकस्मिक निधन झाल्याची घटना नुकतीच घडली. मच्छिंद्र हा हातावर संसार असलेल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा त्यामुळे त्याच्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेमुळे अक्षरश: आभाळ कोसळले. त्याचे वडील रामभाऊ भडके व आई सिंधुबाई हे उभयंता मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात. एकुलता एक मुलगा अचानक सोडून गेल्याने हे कुटुंब अक्षरश: उघड्यावर आले. मच्छिंद्र हा स्वभावाने अत्यंत गुणवान व प्रामाणिक असल्याने त्याचा मित्र परिवार मोठा राहिला.
आपल्या मित्राच्या अचानक जाण्याने हा मित्र परिवार शोकाकुल झाला. मात्र केवळ शोक करण्याने भागणार नाही. तर आपण सर्व मित्रांनी यथाशक्ती काही रक्कम जमा करून ती आपल्या मयत मित्राच्या आईवडिलांना मदत म्हणुन देण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते अमोल घोलप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, ईश्वर गुणवंत, कमलेश लांडगे, सचिन शेळके, देविदास हुशार, दिगंबर काथवटे, निरंजन बोरुडे, किरण भोकरे, चैतन्य उन्मेघ आदींसह त्याच्या जिवलग सवंगडयांना सुचली.
त्यांनी एकमेकाशी संपर्क साधून तातडीने एक लाख रुपयांची रक्कम जमा केली. जमा झालेली ही रक्कम शहरातील एका नामांकित पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवली व ठेवीची कागदपत्रे आपला जिवलग मित्र स्व.मच्छिंद्र भडके यांच्या वृद्ध आई वडिलांकडे जमा केली.
शहरातील या कार्यकर्त्यांनी या घटनेतून सामाजिक भान जपण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा असल्याने या सर्व मित्र मंडळाच्या अनोख्या कार्याचे कौतुक होत असून त्यापासून इतरांनीही प्रेरणा घेवून समाजापुढे आदर्श उभा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.