शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक न्या.महादेव गोविंद रानडे यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘न्या.रानडे स्मुर्ती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालीन वकृत्व’ स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. २७ ) शेवगावच्या दिवाणी न्यायाधिश श्रीमती संजना जागुष्टे यांचे हस्ते होणार आहे.
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या या महात्मा सार्वजनिक वाचनालयाची मुहूर्तमेढ सन १८८५ मध्ये न्या.रानडे यांनी केली. सध्या या वाचनालयात १८ दैनिके, १५ साप्ताहिके, ५ पाक्षिके आणि ८० मासिके नियमित येतात. एकूण ग्रंथ संख्या ३८ हजार ३६६ असून बाल वाचकांची पुस्तक संख्या ९ हजार २९४ असून ६ हस्तलिखिते आणि बहुसंख्य दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने वकृत्व स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जात आहे. तसेच साहित्यिक तुमच्या भेटीला, ग्रंथ प्रदर्शन, दिवाळी अंक प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, जागतिक महिला दिन असे विविध उपक्रम राबविले जातात.
दि.२७ जानेवारी रोजी आयोजीत वकृत्व स्पर्धेसाठी ‘आजच्या वाचन संस्कृती समोरील आव्हाने, समाज माध्यमांची विश्वासार्हता, आरक्षणाचा वाढता टक्का/माझी भूमिका, भारतीय संस्कृतीवरील पाश्चिमात्यांचे आक्रमण, न्या.रानडे यांचे सामाजिक कार्य, पद्मभूषण कै.बाळासाहेब भारदे यांचे वकृत्व हे विषय असून प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये ७ हजार, स्मुर्ती चिन्ह, प्रशस्तीपत्र, न्या.रानडे स्मुर्ती फिरता करंडक, दुसऱ्या क्रमांकासाठी ५ हजार रुपये, स्मुर्ती चिन्ह, प्रशस्तीपत्र, तिसऱ्या क्रमांकासाठी ३ हजार रुपये, स्मुर्ती चिन्ह, प्रशस्तीपत्र तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये १ हजार व स्मुर्ती चिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिली जातील. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश भारदे सचिव मधुकर देवणे यांनी दिली. प्रा. उमेश घेवरीकर, प्राचार्य डॉ.ओंकार रसाळ, ग्रंथपाल साजिद शेख स्पर्धेची व्यवस्था पाहत आहेत.