तळमळीने कलेचा प्रसार करणारे शिक्षक समाजचे खरे वैभव – कांबळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : ‘शैक्षणिक साक्षरते इतकीच समाजाला कलासाक्षरतेची गरज असून हे काम तळमळीने करणारे शिक्षक समाजचे खरे वैभव असतात’, असे प्रतिपादन प्रसिध्द चित्र व शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केले. येथील बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील जेष्ठ कला शिक्षक अशोक कदम व प्राचार्य सुधीर आपटे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

      माजी प्राचार्य प्रा.रमेश भारदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात प्रा.सुधीर आपटे व कलाशिक्षक अशोक कदम यांचा  कांबळे यांच्या हस्ते संपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी भारदे यांनी तळमळीचे व उपक्रमशील  असलेल्या या शिक्षकांची उणीव भविष्यात नक्की जाणवणार अशी भावना व्यक्त केली. आपटे व कदम या दोघांनी मनोगते व्यक्त करतांना संस्था व पदाधिकाऱ्यांचे ऋण व्यक्त केले.

  विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्था व व्यक्तीच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक प्रा.शिवदास सरोदे यांनी तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले. यावेळी हरीश भारदे, श्यामसुंदर भारदे, रजनीकांत छेडा, मधुकर वावरे आदी मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती.