कोपरगाव प्रतिनिधी, दि. ११ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे मंजूर करून घेतलेल्या नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून कोपरगाव तालुक्यातील वारी,ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी लागला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
कोपरगाव मतदार संघातील विजेच्या समस्या गंभीर होत्या. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर अनेक वीज उपकेंद्राच्या क्षमता वाढविण्याबरोबरच नवीन उपकेंद्र देखील मंजूर करून घेतले होते. या मंजूर केलेल्या उपकेंद्राच्या नियोजित कामासाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता.त्या पाठपुराव्यातून ब्राम्हणगाव येथील नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला आहे.
त्यामुळे मागील अनेक दिवसांपासूनच्या ब्राम्हणगाव व परिसरातील गावातील नागरिकांच्या विजेच्या समस्या कायमच्या दूर होणार आहे. त्याचबरोबर या नवीन वीज उपकेंद्राच्या निर्मितीमुळे चास, रवंदे या वीज उपकेंद्राचा भार देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्यामुळे या वीज उपकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांचा देखील वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने होणार आहे. त्यामुळे ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील टाकळी, सोनारी, धारणगाव या गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांची विजेची समस्या सोडविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे काही दिवसांपूर्वीच वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी देखील मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीतून वारी वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी देखील ऊर्जा विभागाने या कामासाठी ६० लाखाच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून ३ एम. व्ही. ए. ची क्षमता असलेले वारी वीज उपकेंद्र ५ एम. व्ही. करण्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला आहे.
लवकरच हे देखील काम सुरू होणार आहे. त्यामुळे मतदार संघातील अत्यंत महत्वाचा असलेला विजेचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात मार्गी लावण्यात यश मिळाले असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.