कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जुन्या तलाठी कार्यालयांच्या नुतनीकरणाचा व काही तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी २०२२/२३ च्या अर्थसंकल्पात कोपरगाव तालुक्यातील २५ तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद केली होती. त्यांची अंमलबजावणी करण्यात आली असून २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी ३३ लाख २० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयांच्या इमारती जुनाट झाल्या होत्या. त्याच बरोबर काही तलाठी कार्यालयांना स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यामुळे या इमारतीमध्ये तलाठी व महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यात अनंत अडचणी येत होत्या. त्याचा त्रास तलाठी कार्यालयात काम घेवून येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांबरोबरच तलाठी व महसूलच्या कर्मचाऱ्यांना देखील होत होता. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सेवा देणारा तलाठी कार्यालय हा अतिशय महत्वाचा भाग असुन शेतकरी व नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तलाठी कार्यालयाचे ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्व अनन्यसाधारण आहे.
शेती बाबतचे दस्ताऐवज व नोंदी या तलाठी कार्यालयात असल्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त नेहमीच ये-जा असते. एवढी महत्वाची जबाबदारी तलाठी कार्यालय पार पाडत असतांना या कार्यालयांच्या अनेक इमारतींची मात्र दुरावस्था झाली होती तर काही तलाठी कार्यालयांना स्वत:ची इमारत नसल्यामुळे मिळेल त्या जागेत कारभार सुरु होता.
याची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेवून त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात तलाठी कार्यालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तेव्हापासून आ. आशुतोष काळे या तलाठी कार्यालयांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध होवून काम सुरु व्हावे यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी ३३ लाख२० हजार रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, धोत्रे, काकडी, पोहेगाव, वारी, चासनळी, शिंगणापूर, संवत्सर, मंजूर, कोकमठाण, मढी बु., चादेकसारे, पढेगाव, ब्राम्हणगाव, धारणगाव, करंजी, येसगाव, तिळवणी, गोधेगाव, धामोरी, वेस, मळेगाव थडी, रांजणगाव देशमुख, जेऊर कुंभारी व कुंभारी या गावातील तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. दुरावस्था झालेल्या व ज्या तलाठी कार्यालयांना स्वताच्या इमारती नव्हत्या त्या सर्व तलाठी कार्यालयांच्या इमारतीचा प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिकांना व महसूल कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी सुटणार आहे.
त्यामुळे वरील २५ गावे व ज्या गावांना या तलाठी कार्यालयाशी जोडलेले आहे त्या गावातील शेतकरी व नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले असून तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.