कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कायम कर्मचारी गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ३.२० लाखाच्या नुकसान भरपाईचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती मंगल गोविंद पन्हाळे यांना देण्यात आला आहे.
कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन हा त्या कुटुंबासाठी मोठा धक्का असतो. एकीकडे दु:खाचा डोंगर व दुसरीकडे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी त्यामुळे ह्या कुटुंबांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबाची होणारी आर्थिक ओढाताण दूर होऊन या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक अशोकराव काळे यांच्या सूचनेनुसार व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांचा विमा उतरविला आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर त्या कुटुंबांना दिलासा मिळत आहे.
मयत कर्मचारी गोविंद पन्हाळे यांचे कामावर येत असतांना अपघाती निधन झाले होते. निधनानंतर कारखाना व्यवस्थापनाने विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्यातून त्यांच्या वारसांना ३.२० लाखाची नुकसान भरपाई मिळाली आहे. या नुकसान भरपाईचा धनादेश आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती मंगल गोविंद पन्हाळे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, लेबर ऑफिसर सुरेश शिंदे, टाईमकिपर विरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.