निवारा परिसरातील माणसं घराला घरपण देणारी – राघवेश्वरानंदगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव तालुक्यातील निवारा परिसराची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या सर्वत्र ख्याती आहे. घराला घरपण देणारी निवारा परिसरातील माणसे असून पांडुरंग सावली या बहुउद्देशीय सभा मंडपाचे लोकार्पण ही बाब निवारा परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. सदा सर्वकाळ या सभा मंडपाद्वारा निवारावासियांना सावली मिळणार असल्याची भावना परमपूज्य मठाधिपती श्री.श्री.१०८ महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली.

कोपरगाव शहरातील गुळाचे व्यापारी व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक कांतीलाल हरलाल जोशी यांच्या देणगीतून निवारा परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिर येथे साकार झालेले पांडुरंग सावली या सभा मंडपाचे कुंभारी येथील परमपूज्य मठाधिपती श्री.श्री.१०८ महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक करताना निवारावासियांचे मार्गदर्शक काका कोयटे म्हणाले की, या ठिकाणी  १९८४ मध्ये १० बाय १० चा गाभारा बांधला होता त्यात महादेवाच्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करून तत्कालीन निवारा भजनी मंडळाने एक धार्मिक वातावरण तयार केले होते. निवारा भजनी मंडळाने दररोज सकाळी काकड आरत्या, हरिपाठ यांमुळे निवारा परिसरात धार्मिकतेचा सुगंध ३८ वर्षानंतर ही दरवळत आहे. आज कांतीलाल जोशी यांच्या दातृत्वाने महादेव मंदिर व हनुमान मंदिर समोरील परिसराला पूर्णत्व आले आहे.

प्रसंगी राघवेश्वरानंदगिरी महाराज आणि समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते पांडुरंग सावली सभा मंडपासाठी ज्यांनी दातृत्व बहाल केले असे समता पतसंस्थेचे संचालक कांतीलाल जोशी यांचा सत्कार करण्यात आला. कोपरगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंब पदाधिकरी आणि निवारा परिसरातील श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार यांनी ही कांतीलाल जोशी यांच्या दातृत्वाबद्दल सत्कार करत सन्मान केला.

तसेच ९६ दिवसात पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल निवारा परिसरातील ह.भ.प. बाळकृष्ण महाराज सुरासे व बापूसाहेब इनामके यांचे संतपुजन करत तसेच शैक्षणिक क्षेत्रात विद्यादानाचे कार्य प्रामाणिकपणे करून निवारा परिसरातील १८ सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यादानाचे काम करताना स्वतःतील कला – गुणांद्वारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाऱ्या ४ शिक्षक आणि निवारा परिसरातील ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची ८४ वर्ष पूर्ण करणारे जगन्नाथ बैरागी आणि त्यांच्या पत्नी सौ.सुमन बैरागी यांचा भव्य सत्कार निवारावासियांचे मार्गदर्शक काका कोयटे व महादेव मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करून सन्मान करण्यात आला. तसेच ह.भ.प.विकास महाराज गायकवाड यांनी किर्तन रुपी सुश्राव्य वाणीतून ज्ञान आणि भक्तीचा मेळ घालत निवारावासियांच्या धार्मिक भावना वाढविल्या.

ज्ञान आणि भक्तीचा मेळ घालताना ह.भ.प.विकास महाराज गायकवाड म्हणाले की, निवारा परिसरात खूप कार्यक्रम होत असतात, पण त्या कार्यक्रमांना अविस्मरणीय कसे करायचे हे निवारावासियांकडूनच शिकले पाहिजे. निवारावासियांनी संत – महंतांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा अविस्मरणीय बनविला आहे. महाराष्ट्रातील सहकाराला समृद्ध करणारे व निवारावासियांचे मार्गदर्शक काका कोयटे यांच्या दातृत्वाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. समाजात दान करणारे खूप असतात, पण दान करण्यासाठी जे पात्र असतात त्यांच्याकडूनच दान होते.

सोहळ्याचे सुत्रसंचालन अनंत बर्गे यांनी केले. समता पतसंस्थेचे जेष्ठ संचालक चांगदेव शिरोडे, व्यापरी बद्रीनाथ डागा, बाळूशेठ बजाज, जेष्ठ नागरिक संघाचे विजय बंब,पदाधिकारी, श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता सुतार, कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमॅन असो.चे अध्यक्ष युवराज गांगवे, नगरसेविका सौ.दिपा गिरमे, निवारा परिसरातील लक्ष्मीनारायण भट्टड, सुरेंद्र व्यास, नागरिक, हितचिंतक यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सोहळा यशस्वीतेसाठी समता पतसंस्था, महादेव मंदिर व्यवस्थापन समिती, निवारा भजनी मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार जनार्दन कदम यांनी मानले.