इन्फ्लूएंझा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावेआमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : मागील काही दिवसांपासून देशात व राज्यात (H3N2)  अर्थात इन्फ्लूएंझा या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत असून त्याचे लोन नगर जिल्ह्यात देखील पसरले असून २३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे या विषाणूचा कोपरगाव तालुक्यात प्रसार होणार नाही यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

इन्फ्लूएंझा या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूच्या वाढत्या संसर्गाने आरोग्य विभागासह सर्वांचीच काहीशी चिंता वाढवली आहे मात्र घाबरून जावू नये. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप आदी आजार झाल्यास आजार अंगावर काढू नये व घरगुती उपचार न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा.

मागील काही महिन्यांपासून जीवघेण्या कोरोनाची डोकेदुखी कमी झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती निर्धास्त होवून  मोकळा श्वास घेवू लागले होते. मात्र नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूच्या संसर्गाने काहीशी चिंता वाढवली आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जावू नये. वैश्विक कोरोना महामारीचा आपण यशस्वीपणे मुकाबला करून या कोरोना महामारीला हद्दपार केले होते. त्याच धर्तीवर आरोग्य विभागाला आवश्यक असणारी सर्वोतोपरी मदत करू व या नव्या इन्फ्लूएंझा या विषाणूला देखील पळवून लावू.

आरोग्य विभागाने कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास तातडीने संपर्क करावा सर्व अडचणी तात्काळ दूर केल्या जातील मात्र नागरिकांचे आरोग्य जपा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी केल्या असून स्वत:च्या व कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.