शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यातील पूनर्वसित ताजनापुर ग्रामपंचायतीचे हद्दीत महिला सरपंच व उपसरपंचाचे पती व ग्रामसेवकांस हातासी धरून होत असलेले अतिक्रमण त्वरित रोखावे यासाठी आप्पासाहेब किसन वीर, बनकर एकनाथ गायकवाड व रेखा गोरख कौंसे या तीन ग्रामपंचायत सदस्यासह तीस-पस्तीस ग्रामस्थांनी आज शेवगाव पंचायत समितीच्या प्रवेश दारातच सुरू केलेले बेमुदत उपोषण गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सदरचे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून महाराष्ट्र ग्रामपंचायत १९५८ चे कलम ५३ नुसार कार्यवाही करण्याचे आदेश ग्रामसेवकास दिल्याने सायंकाळी उपोषण आटोपतते घेण्यात आले.
या संदर्भात गटविकास अधिकारी यांना त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ताजनापूर ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक १३१ मधील रिकाम्या जागेवर अनिल गिरे व भागवत गीरे यांनी प्रथम पत्र्याच्या शेडचे बांधकाम केले . त्यावेळेस ३० डिसेंबर २१ रोजी तेथे काम न करण्याबाबतची नोटीस दिली. तरीही काम बंद न करता उलट पत्राची शेड काढून आरसीसी बांधकामाची आखणी करून बांधकाम सुरू केले.
त्यावर पुन्हा १३ जानेवारी २२ ला पुन्हा नोटीस देण्यात आली. तरीही त्यांनी काम थांबविले नाही. म्हणून १ जून २२ ला ग्रामसेवकांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अधिनियम १९५९ चे कलम ५३( २ ) नुसार कारवाई करण्यात येईल. आपण त्वरित अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा आपल्यावर शासन निर्णयानुसार फिर्याद दाखल करण्यात येईल. अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर बांधकाम थांबविले.
मात्र दरम्यानच्या काळात संबंधित ग्रामसेवकाची बदली झाली. तेथे ताराचंद साळवे हे नवीन ग्रामसेवक रुजू झाले. त्यानंतर भागवत गीरे यांनी सरपंचाचे व उपसरपंचाचे पती व नवीन ग्रामसेवक यांच्याशी हात मिळवणी करून पुन्हा बांधकाम सुरू केले आहे. ग्रामसेवकांना याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच पूर्वीचे ग्रामसेवक सचिन वीर यांनी ग्रामपंचायत नमुना नंबर आठ ला ही नोंद ओढली असल्याने ग्राम पंचायत बॉडी अथवा ग्रामसेवक ते बांधकाम थांबवू शकत नाही. असे सांगून कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. एक प्रकारे त्यांना अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देण्याचा प्रकार झाला आहे.
दरम्यानच्या काळात भागवत विनायक गिरे यांनी घराचे गट लेव्हलचे काम पूर्ण केले. या घटनेमुळे गावामध्ये अतिक्रमण धारकांचा सुळसुळाट सुरू झाला असून कोणीही कायद्याचे व नियमाचे पालन करण्यास तयार नाही. एकाच जागेवरून दोन जणांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहेत. अराजकता उफाळलेली आहे. म्हणून या बांधकामाचा प्रतिबंध करावा. असा ९ मार्च २३ रोजी दिलेल्या अर्जावर आज तागायत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने नाईलाजाने उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गटविकासअधिकारी महेश डोके यांनी ग्रामसेवकास झालेले अतिक्रमण निष्काशीत करण्याचे आदेश दिल्यानंतर उपोषण आटोपते घेण्यात आले.