कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशनचा विकास करून रेल्वे स्टेशनचा कायापालट केल्याचा दावा निव्वळ हास्यास्पद आहे. आ. आशुतोष काळेंच्या अख्यत्यारीत केंद्र सरकारचे मंत्रालय येत असेल तर तो संशोधनाचा विषय आहे. गेले साडे तीन वर्षात स्वत: काहीही काम न करता फुकटचे श्रेय घेण्यासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या आ. काळे यांनी त्यांच्या अख्यत्यारीत येत नसलेल्या रेल्वे मंत्रालयाशी संबंधित प्रश्न आपणच सोडविल्याचे खोटे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. त्यातूनच त्यांचे समर्थक कार्यकर्ते धादांत खोटी माहिती देऊन आपल्या अज्ञानपणाचे प्रदर्शन घडवत आहेत, अशी टीका वैभव गिरमे यांनी केली आहे.
कोपरगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आ. काळे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मांडून त्या सोडविल्याचा दावा आ. काळे यांचे समर्थक दिनार कुदळे यांनी केला आहे. मुळात कुदळे यांचा हा दावाच चुकीचा आहे. राज्य सरकारशी संबंधित कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, हे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी काहीही प्रयत्न न करता माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन करून श्रेय घेण्यापलीकडे आ. काळेंनी आजपर्यंत काहीच केले नाही.
आ. काळेंच्या निष्क्रियतेमुळे गेल्या साडेतीन वर्षांत कोपरगाव मतदारसंघाची विकासाच्या बाबतीत खूपच पिछेहाट झाली असून, मतदारसंघातील पाणी, वीज, रस्ते, शेती, आरोग्य, शिक्षण व जनतेचे इतर अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांना साफ अपयश आले आहे. त्यांचे निष्क्रिय कर्तृत्व साऱ्या जनतेसमोर आहे.खोटे बोल पण रेटून बोल यासाठी त्यांनी आपल्या काही खास चेले चपाट्यांना कामाला लावले आहे.
जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शिर्डीला येणाऱ्या लाखो साईभक्त हे कोपरगाव रेल्वे स्टेशन येथून प्रवास करतात, उत्तर व दक्षिण भारताला जोडणारे दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्टेशन असून,या ठिकाणी अनेक एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वेगाड्या थांबतात. कोपरगाव रेल्वेस्थानकावर प्रवाशांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच रेल्वे विकासाची असंख्य कामे केंद्र सरकारच्या रेल्वे विभागातून नियमित सुरूच असते.अशी असंख्ये कामे माजी आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात झाली. त्यासाठी स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनदरबारी पाठपुरावा केल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधीही मिळाला;
परंतु त्यांनी कधीही याचा गवगवा केला नाही किंवा त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कामांचे श्रेय घ्यावे की न घ्यावे इतका समंजपणा त्यांनी दाखवला, स्नेहलताताई कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची वारंवार भेट झाल्यावर रेल्वे विभागाचे कोपरगाव निगडित प्रश्नांची चर्चा केली होती, त्यांनीही नेहमीच त्यावर सकारात्मक आदेश पुढील स्तरावर केले आहे ज्याचे श्रेय कोल्हे यांनी कधीच आजवर घेतले नाही.
याउलट आ. काळे यांनी कधी राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, रेल्वे विभाग असे अनेक असंबंधीत क्षेत्राचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, असे अनेक हास्यास्पद प्रकार त्यांचे सुरू आहे. हे समजायला जनता काही दूधखुळी नाही, असा टोलाही गिरमे यांनी लगावला आहे.
काळेंच्या चेले चपाट्यांच्या गटात दिनार कुदळे हे अभ्यासू म्हणून ओळखले जातात; त्यांच्या नावाने पेरली जाणारी बातमी हे त्यांचे वैयक्तिक मत नसावे व ते देखील त्यांच्याच नावाने दिलेल्या बातमीशी ते सहमत नसावे. दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन या बातम्या कार्यकर्त्यांचा बळी देण्यासाठी दिल्या जातात हे संपुर्ण तालुक्याला माहीत आहे. ज्यांच्या नावाने बातम्या दिल्या जातात त्यांनाही बातमी दिलेली माहिती नसते असे ते कार्यकर्ते खाजगीत बोलत असतात. तरीही आमदारांनी हे खालच्या थराचे राजकारण सोडून द्यावे व विकासाच्या मुद्द्यांवर युवानेते विवेक कोल्हे यांनी वेळोवेळी केलेल्या आवाहना प्रमाणे आमदारांनी स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी यावे असे आवाहन गिरमे यांनी केले आहे.