शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : येथील न्यू आर्टस् महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त त्यांच्या वाचनाच्या व्यासंगी वृत्तीला अभिवादन म्हणून आज गुरुवारी ( दि. १३ ) विद्यार्थ्यांसाठी आठ तास अभ्यास वाचन व उद्या शुक्रवारी ( दि. १४ ) महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी १२ तास वाचन असे दोन दिवसीय वाचन अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी केले. या उपक्रमात विद्यार्थांना वाचन करण्यासाठी कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र, प्रेरणात्मक, मनोरंजनात्मक, अभ्यासक्रमाचे, विषयानुसार संदर्भ असे ग्रंथ विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार देण्यात आले.
यावेळी ग्रंथपाल प्रा . मिनाक्षी चक्रे म्हणाल्या, वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अशा उपक्रमची गरज असते . त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये वाचन संस्कृतीचा विकास करणे यावर भर दिलेला आहे.
उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. संदीप मिरे, डॉ. रवींद्र वैद्य या वेळी उपस्थित होते . उप्रमात एकूण १२० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यासाठी बाळासाहेब आठरे, नंदू बर्डे, मोनिका काकडे यांनी योगदान दिले.