कोपरगाव प्रतिनिधी,दि. १४ : शहरातील अत्यंत धोकादायक खंदक नाला त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट खंदक नाल्यात उतरून नगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधून घेतले.
कोपरगाव शहरातील खंदक नाला मागील पावसाळ्यात तुंबून अनेक गोरगरिबांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, त्यामुळे खंदक नाल्यावरील झालेले अतिक्रमण हा प्रश्न मागील वर्षी ऐरणी वर आला होता त्यानंतर नगर पालिकेला जाग येऊन खंदक नाल्या वरील अतिक्रमण तातडीने काढण्यात आले मात्र पावसाळा तोंडावर आला तर या नाल्याची दुरुस्ती झाली नाही
या आधी कोपरगाव शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाला दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करावे म्हणून मागणी केली. मात्र नगर पालिकेने अद्याप काम सुरू केले नाही त्यामुळे आज महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अनिल गायकवाड, लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ, दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, भूमी पुत्र फाउंडेशनचे निसार शेख यांनी खंदकनाला दुरुस्त करावा म्हणून थेट नाल्यात जाऊन बसले.
या वेळी अँड. नितीन पोळ म्हणाले की, आंदोलन केल्याशिवाय नगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही का? गोर गरिबांच्या घरात पाणी शिरल्यावर आपत्कालीन व्यवस्था म्हणून नुसती खिचडी वाटण्या पेक्षा नाला त्वरित दुरुस्त करावा. तर मनसेचे अनिल गायकवाड यांनी पावसाळा सुरू झाला पण नगर पालिका प्रशासन झोपी गेलेले आहे त्वरित नाला दुरुस्त न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला.
यावेळी आंदोलन कर्त्याना त्वरित नगरपालिका मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेत बोलावून घेवून खंदकनाला दुरुस्तीच्या कामकाजाचे कागद पत्र दाखवून त्वरित काम सुरू करू असे आश्वासन दिले व संबंधितांना काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.