कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन आणि पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शासनाने २८ कोटी ५० लाख रुपये निधी यापूर्वीच मंजूर केला आहे. या दोन्ही इमारतींचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्नेहलताताई कोल्हे यांना वेळ दिलेली आहे. पालकमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय घाईगडबडीत भूमिपूजन करणे हा संहितेचा भंग ठरेल. त्यामुळे या बहुप्रतिक्षेत असणाऱ्या वास्तूंचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते होण्यासाठी वेळ मिळाली असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिली आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर यांना निवेदन दिले असून, त्यात उपरोक्त मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत कोपरगावचे तहसीलदार, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे व कोपरगाव तालुका ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे.
पूर्वी कोपरगाव शहर आणि तालुक्यासाठी एकच पोलिस ठाणे कार्यरत होते. कोपरगाव तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोपरगाव शहर व ग्रामीण अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार व भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी शासनाकडे केली होती. त्यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने कोपरगाव शहर पोलिस स्टेशन आणि कोपरगाव ग्रामीण (तालुका) पोलिस स्टेशन अशा दोन स्वतंत्र पोलिस ठाण्यांची निर्मिती केली आहे.
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या जुन्या इमारतीची दयनीय अवस्था लक्षात घेऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला. या निधीतून कोपरगाव शहर पोलिस ठाण्याची नवीन सुसज्ज वास्तू उभारण्यात आली आहे. मात्र, कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे अस्तित्वात आल्यापासून या पोलिस ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नाही.
सध्या ज्या ठिकाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कामकाज चालते तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाज करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या पोलिस कर्मचारी वसाहतीतील घरांची दुरवस्था झाली असून, ही घरे सद्य:स्थितीत पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यायोग्य नाहीत. या ठिकाणी सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणी भेडसावत आहेत.
या सर्व बाबी लक्षात घेऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीसाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करून, बैठका घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. स्नेहलताताई कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीकरिता २८ कोटी ५० लाख रुपये निधी यापूर्वीच मंजूर केलेला आहे. या कामाच्या निविदा व इतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नुकतीच या दोन्ही इमारतीच्या प्राथमिक स्वरूपातील कामास सुरुवात झाली आहे.
कोपरगाव ग्रामीण पोलिस स्टेशन व पोलिस कर्मचारी वसाहतीच्या नवीन इमारतीमुळे कोपरगावच्या वैभवात भर पडणार आहे. या दोन्ही इमारतींचे भूमिपूजन कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पार पडणार आहे. सदर कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांना वेळसुद्धा दिलेली आहे. तत्पूर्वी अन्य कोणत्याही प्रकारे सदर भूमिपुजनाचा घाट घालू नये.
मंत्रिमहोदयांच्या विभागांतर्गत उभारल्या जाणाऱ्या या दोन्ही गौरवशाली वस्तूंचे भूमिपूजन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय घाईने करणे हा संहितेचा भंग ठरेल. त्यामुळे या दोन्ही नवीन इमारतींचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात यावा, अशी आग्रही मागणी कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी समवेत संजय पवार, राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते.