कडकडीत बंद पळून निषेध
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : शहरातील २० वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार व धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवार दि. २० जुलै रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून जन आक्रोश निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोपरगाव तालुका महासंघाच्या वतीने देखील दुकाने, आस्थापने बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी होणार असून नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या बुधवारी पिडीत मुलीने शहरातील मदरसा येथे झालेला अत्याचार व धर्मांतर प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेवून मोर्चाची माहिती देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, मनसेचे संतोष गंगवाल, सेनेचे सनी वाघ, कल्विंदरसिंग डडीयाल, संतोष चवंडके, अनिल गायकवाड आदि उपस्थित होते.
समाजामध्ये दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे, हे कुठे तरी थांबावे. भविष्यात अशा घटना होऊ नये.आरोपींवर चाप बसावा. अन्यथा समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल. तसेच पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.