२०२२ च्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान द्या – आमदार काळे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० :  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकरी मागील वर्षाच्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असून चालू वर्षी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान तातडीने द्या असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांना घातले आहे.

आ.आशुतोष काळे यांनी मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यात सुरेगाव व पोहेगाव मंडलातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमध्ये एकूण १८३२३ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदरच्या नुकसानीचे पंचनामे होवून १०७१६ शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळालेले आहे.

परंतु अजूनही ७६०७ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तसेच कोपरगाव, दहेगाव बोलका व रवंदे मंडळातील २७२०० शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना देखील तातडीने नुकसान भरपाई अनुदान मिळणे गरजेचे आहे. चालू वर्षी कोपरगाव मतदार संघात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावर पेरण्या केल्या आहेत.मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहेत.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मागील वर्षाच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. सदर मागणीची पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी गंभीरपणे दखल घेवून लवकरात लवकर, अनुदान देणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.