कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे सर्व विभाग आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मधिल अंतिम वर्षातील ७५३ अभियंत्यांना सुमारे १२० नामांकित कंपन्यांमध्ये वार्षिक पॅकेज रू २० लाखांपर्यंतच्या नोकऱ्या मिळवुन देण्यात यश आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नोकऱ्या मिळवुन दिल्याने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज हे ग्रामिण भागातील मुलां मुलींसाठी वरदान ठरले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाव्यात अथवा त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावे, या हेतुने ४० वर्षांपूर्वी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना केली. त्यांचा हेतु सफलही झाला. परंतु याही पेक्षा त्यांना अधिकची अपेक्षा होती. तंत्रज्ञान रोज बदलते आणि आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकविले तर नामांकित कंपन्या आपल्या अभियंत्यांना अधिकची पसंती देतील, हा स्व. कोल्हेंचा विश्वास होता.
म्हणुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने उत्तर महाराष्ट्रातील पहिले ऑटोनॉमस कॉलेज म्हणुन २०१९ साली दर्जा प्राप्त केला. यामुळे इंडस्ट्रीला लागणारे आधुनिक ज्ञान असणारे अभियंते देण्यासाठी इंडस्ट्रीजच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात अंतर्भाव करता आला आणि त्याचे फलित म्हणुन ऑटोनॉमसची पहिल्या बॅचच्या तब्बल ७५३ अभियंत्यांना नोकऱ्या मिळवुन देण्यात यश आले.
टी अँड पी विभागाचा विविध नामांकित कंपन्यांशी संपर्क, कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख, वेगवेगळ्या कंपन्या आणि ट्रेनिंग प्रोव्हायडर एजन्सीज बरोबर टाय अप, जापनीज आणि जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ट्रेनर्स, नामांकित कंपन्यांमधील यशस्वी अभियंत्यांची विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने, माजी विद्यार्थ्यांच्या सुचनांची अंमलबजावणी, परदेशी विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार, अनुभवी, उच्च शिक्षित आणि जो पर्यंत विद्यार्थ्यांचे शिकविण्याबाबत समाधान होत नाही,
तो पर्यंत शिकविण्यासाठी तसेच प्रात्यक्षिके करून घेण्यासाठी झोकुन देणारा प्राध्यापक वर्ग, वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांच्यातील उत्तम संवाद आणि समन्वय, इत्यादी बाबींचे फलित म्हणुन चालु वर्षी ७५३ अभियंत्यांना उच्चांकी नोकऱ्या देण्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला यश प्राप्त झाले आहे.
नोकऱ्या देणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्यत्वेकरून सेलेबल टेक्नॉलॉजिज, रेनाटा, कोलगेट पालमोलिव्ह, केपीआयटी, व्हर्चुसा, हेक्झावेअर टेक्नॉलॉजिज, टीसीएस, डेलॉईट, जॉनसन कंट्रोल्स, नेटविन, इपिटोम, विंजित टेक्नॉलॉजिज, लार्सन अँड टुब्रो, टोयो इंजिनिअरींग, ब्ल्यु स्टार, मदरसन, टेेक महिंद्रा, फोर्स मोटर्स, पोराईट, स्टर्लिंग अँड विल्सन, अशा सुमारे १२० कंपन्यांचा समावेश आहे, असे कोल्हे शेवटी म्हणाले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, टी अँड पीची सर्व टीम व सर्व विभाग प्रमुखाचे अभिनंदन केले आहे. संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, डायरेक्टर डॉ. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख व टी अँड पी विभागाची सर्व टीम यांच्या समवेत विविध कंपन्यांमध्ये निवड झालेले अभियंते.